राज्यातील शेतकरी दुष्काळामुळे होरपळत आहे. मात्र, काँग्रेसचे सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप भाजप रयत मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष ए. एस. पाटील नडहळ्ळी यांनी केला.
बेळगाव येथे शनिवारी पत्रकार परिषदेत बोलताना ए. एस. पाटील नडहळ्ळी म्हणाले की, काँग्रेसची सत्ता येऊन नऊ महिने उलटले तरी राज्यात विकासाची कामे सुरू नाहीत. जिल्हा पालकमंत्री, ग्रामपंचायतींनी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकांच्या नुकसानीचा आढावा घेतला नाही. दुष्काळी परिस्थितीकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला.
काँग्रेसने जाहीरनाम्यात दुधाला प्रतिलिटर 7 रुपये प्रोत्साहन दर देण्याचे आश्वासन दिले होते. ते आजवर पूर्ण झाले नाही. आता दुष्काळ असून ग्रामपंचायतीने गोशाळा उघडाव्यात. गुरांसाठी चारा व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी केली.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शेतकरी विरोधी अर्थसंकल्प सादर केला आहे. शेतकऱ्यांना मदतीची योजना लागू झाली नाही. येडियुरप्पा मुख्यमंत्री असताना किसान सन्मान योजनेंतर्गत दिलेली चार हजारांची मदत थांबवण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या मुलांना देण्यात येणारी शिष्यवृत्तीही बंद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सरकारने शेतकऱ्यांसाठी एकही योजना केलेली नाही. राज्यात भीषण दुष्काळ आहे. नैसर्गिक आपत्ती आल्यास एनडीआरएफ, एसडीआरएफ या संस्था मदत करतात. मात्र सरकारने त्यांच्याकडे मदत मागितली नाही, असे ते म्हणाले.
यावेळी भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, महानगर जिल्हाध्यक्षा गीता सुतार, बसवराज, इरय्या, कल्लाप्पाण्णा, यांच्यासह भाजप रयत मोर्चाचे अनेक नेते उपस्थित होते.


Recent Comments