Belagavi

प्राणवायू देणारा वॅक्सीन डेपो बनतोय धोकादायक : सरपटणाऱ्या प्राण्यांचा वाढता वावर

Share

वॅक्सीन डेपो परिसराला बेळगाव शहराचा प्राणवायू असे म्हटले तर वावगे ठरणार नाही . रोज पहाटे निसर्गाच्या सान्निध्यात मॉर्निंग वॉकसाठी या परिसरात अनेक लोक येत असतात . मात्र इथे उभ्या करण्यात आलेल्या जुन्या गाड्या , रुग्णवाहिका , वाढलेले गवत , यामुळे या परिसराला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे . शिवाय या ठिकाणी सरपटणाऱ्या प्राण्याचा वावर वाढला आहे . यामुळे इथे येणाऱ्या लोकांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे . या परिसरातून या गाड्या हटवून इथे स्वच्छता राखावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांनी केली आहे .

जिथे पाहावे तेथे बंद पडलेल्या जुन्या रुग्णवाहिका … सगळीकडे उगवलेले गवत , झाडेझुडपे ..त्यामुळे पक्षीं डेपोचे स्वरूप एकदम भकास दिसू लागले आहे . रोज सकाळी वायुविहारासाठी येणाऱ्या लोकांनी हा परिसर गजबजून जातो . इथल्या झाडांमुळे आणि शहरी गजबजाटापासून काहीसा दूर असा हा भाग मॉर्निंग वॉकर्सना , जेष्ठ नागरिकांना उपयुक्त असा आहे . इथले निसर्गसौंदर्य , मोकळी ताजी हवा सर्वानाच भुरळ घालते .

मात्र या परिसरात आरोग्य विभागाच्या बंद पडलेल्या रुग्णवाहिका , दुचाकी तसेच वाढलेले गवत यामुळे इथे आता सरपटणारे प्राणी वाढले आहेत . या वाढलेल्या गवतांमधून ते झटकन सरपटत जातात . यामध्ये ते सॅप विषारी देखील असू शकतात . चुकून कोणाला दंश झाला तर एखाद्याच्या जीवावर देखील बेतू शकते .

या जुन्या गाड्यांमध्येही या सापांचे वास्तव्य नुकतेच आढळून आले आहे . त्यामुळे या गाड्यांचा किमान लिलाव करून हा परिसर मोकळा करून द्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांनी केली आहे .

Tags: