सर्वात भीषण दुष्काळी जिल्ह्यांपैकी एक असलेल्या विजयपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा भीषण दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे. एकूणच शेतकऱ्यांचे दु:ख कमी झालेले नाही. तशातच शनिवारच्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील अनेक भागात अराजकता निर्माण केली आहे. यासंबंधीचा हा वृत्तांत.
होय, विजयपूर जिल्हा हा राज्यातील सर्वाधिक दुष्काळी जिल्हा आहे. दरवर्षी विजयपूर जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळाने होरपळत आहेत. तशातच जिल्ह्यात काल उशिरा झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील विविध भागात अनेक शेतकऱ्यांच्या लिंबू पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील जांबगी, अहेरीसह मडाळा वस्तीतील ४० हून अधिक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. रविवारी बाजारात लिंबू नेण्यासाठी शेतात गेलेल्या शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले. लिंबांची संपूर्ण झाडे अवकाळी पावसामुळे मुळासकट उखडून पडल्याचे दिसून आले. याबाबत अधिकाऱ्यांना फोन करूनही अधिकारी फोनला उत्तर देत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
बाइट: रमणगौडा पाटील, शेतकरी नेते
दुसरीकडे विजयपूर तालुक्यातील बोम्मनळ्ळी गावातील मुरुगेप्पा चौगले यांच्या बागेतील केळीचे पूर्ण नुकसान झाले. सुमारे एक एकर परिसरात उगवलेली केळीची झाडे पूर्णत: खराब झाली असून, सुमारे रु. दोन लाखांचे नुकसान झाले आहे. काढणीच्या टप्प्यात आलेली केळीची झाडे उद्ध्वस्त झाली असून विजेचे खांबही मोडून पडले आहेत. हातात आलेला घास तोंडापर्यंत पोहोचत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. दरम्यान, इंडी तालुक्यातील हलगुनकी गावातील विश्वनाथ पाटील यांच्या द्राक्ष बागेतील द्राक्षांच्या वेलींवर विद्युत खांब पडल्याने बागेसागे मोठे नुकसान झाले आहे. द्राक्ष उत्पादक विश्वनाथ पाटील यांनी सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे. रात्री उशिरा गुनकी गावात वीज कोसळून नानागौडा बिरादार या शेतकऱ्याच्या दोन बैलांचा मृत्यू झाला असून त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.
एकंदरीत जिल्ह्यात अवकाळी वादळी पावसाने अनेक संकटे निर्माण केली असून, दुष्काळी जिल्ह्यातील शेतकरी देशोधडीला लागला आहे. कालच्या नुकसानीची योग्य ती भरपाई लवकरात लवकर मिळावी हा शेतकरी नेत्यांचा आग्रह आहे.
विजयकुमार सारवाड, इन न्यूज, विजयपूर.


Recent Comments