हरियाणाच्या विशाल भोंडू याला अस्मान दाखवत पुण्याच्या महेंद्र गायकवाडने बेळगाव तालुक्यातील उचगाव येथे जय हनुमान कुस्तीगीर संघटनेच्या वतीनं आयोजित कुस्ती मैदान मारले.
उचगाव येथे जय हनुमान कुस्तीगीर संघटनेच्या वतीनं रविवारी दुपारी कुस्ती आखाड्याचे आयोजन केले होते. उचगाव पंचक्रोशीतील कुस्तीप्रेमींची प्रचंड गर्दी या मैदानाला झाली. पहिल्या क्रमांकाची कुस्ती हरियाणाचा विशाल भोंडू आणि पुण्याच्या महेंद्र गायकवाड यांच्यात लावण्यात आली.
दोन्ही पैलवानांनी एकमेकांच्या ताकदीचा अंदाज घेत कुस्ती जिंकण्याचा प्रयत्न केला. पट काढत, कस लावत दोन्ही मल्लांनी आपापल्या परीने कुस्ती खेळली. अखेर या एक नंबरच्या कुस्तीत विशाल भोंडू या पैलवानला महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला चीत करणारा पुण्याचा पैलवान महेंद्र गायकवाड याने अस्मान दाखवत उचगावचे कुस्ती मैदान मारले

उचगाव येथील या मैदानात पैलवान परविन उचगाव याने चांदीची गदा जिंकली. त्याने प्रतिस्पर्धी पैलवान ज्योतिबा मावळी, कोल्हापूर याला चीत करून चांदीची गदा पटकावली उचगावमधील पूर्व दिशेकडील मरगाई देवीच्या तलावामध्ये हा कुस्ती आखाडा भरवण्यात आला होता. त्यात लहानमोठ्या एकूण ६४ कुस्त्या झाल्या. कुस्त्या पाहण्यासाठी उचगाव पंचक्रोशीतील अनेक गावच्या कुस्तीप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. नेटक्या नियोजनामुळे कसलाही गडबड-गोंधळ न होता हे मैदान सुरळीतपणे पार पडले.


Recent Comments