रिमिक्स गाण्यांचा डीजेवर दणदणाट, रेन डान्सचा उल्हास अशा धुंद आणि कुंद वातावरणात बेळगावातल्या शहापूर, वडगाव आणि खासबाग येथे एकमेकांवर रंगांची उधळण करत जल्लोषात रंगपंचमी साजरी करण्यात आली.
बेळगाव शहरातील शहापूर, वडगाव, खासबागसह तालुक्याच्या पश्चिम ग्रामीण भागात आज परंपरेनुसार पाचव्या दिवशी रंगपंचमी साजरी करण्यात आली. सकाळपासूनच रस्त्यांवर तरुण, लहान मुले, युवती आणि महिलांनी एकमेकांवर रंग उधळत आनंद साजरा केला. हातात रंगांच्या पिशव्या आणि पिचकाऱ्या घेऊन युवक-युवती दुचाकीवरून फिरत होते. त्यांनी समोर आलेल्यांवर रंग उधळत आणि त्यांना होळीच्या शुभेच्छा देऊन रंग खेळला.
विविध आकारांचे मुखवटे घातलेल्या तरुण-तरुणींनी लक्ष वेधून घेतले. रेन डान्ससाठी खास उभारलेल्या मंडपांखाली पाण्याच्या कारंजाखाली मनसोक्त भिजण्याचा आनंद घेतला. डीजेवर लावलेल्या रिमिक्स, पारंपरिक लोकगीते आणि होळी-रंगपंचमीच्या खास गाण्यांच्या तालावर थिरकताना तरुणाईचा जल्लोष ओसंडून वहात होता. युवती व महिलानी रंगीत पाण्याने भरलेल्या घागरी तरुणांवर आणि वाहनधारकांवर रित्या करत रंगपंचमीचा आनंद लुटला. अनेकांनी समूहाने एकमेकांच्या घरी जाऊन रंग लावत आनंद लुटला.
चेहऱ्याला चंदेरी वर्ख फासून मुखवटे, अंगावर पोती घालून, कमरेला झाडपाला गुंडाळून जंगली आदिवासींप्रमाणे हुंकार काढत, घुमत युवकांच्या एका समूहाने रंगपंचमीत खऱ्या अर्थाने रंग भरला. इन न्यूजशी बोलताना त्यातील युवकांनी यामागची तयारी आणि संकल्पना सांगितली.
मेघा मेहेरवाडे आणि अन्य एका युवतीने सांगितले की, शहापूरच्या रंगपंचमीची मजा काही औरच आहे. त्यामुळे आम्ही बाहेरून येथे खास रंग खेळण्यासाठी आलो आहोत. यंदा पाणीटंचाई असल्याने पावडर रंगांचा वापर केला आहे. सर्वानी पावडर रंग वापरण्याचा सल्ला त्यांनी दिला.

भाजप महानगर ओबीसी मोर्चाचे सरचिटणीस नितीन शालगार यांनी सांगितले की, मुलांसह सर्व वयोगटातील लोक आज रंग खेळण्याचा आनंद लुटत आहेत. बेळगावात शहापूर, वडगाव, खासबाग, येळ्ळूर आणि अन्य ठिकाणी परंपरेनुसार होळीच्या पाचव्या दिवशी रंगपंचमी साजरी करण्यात येते. सध्या निवडणूक आणि परीक्षाही सुरु आहेत. पण सर्वजण आनंदाने, संयमाने रंगपंचमी साजरी करत आहेत. शहापूर भागात एरव्ही पाणीटंचाई जाणवत नाही. पण यंदा आतापासूनच पाणीटंचाई तीव्र झाली आहे. त्यामुळे आम्ही सगळे पावडर रंग उधळून रंग खेळत आहोत. सर्वांनी पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी पावडर रंगांचाच वापर करून रंगपंचमी खेळावी असे आवाहन त्यांनी केले.
शहापूर, वडगाव, खासबाग येथील अनेक गल्ल्यांत डीजेच्या तालावर गाण्यांवर थिरकत तरुण-तरुणींनी रंगाचा आनंद लुटला. दुचाकीवर फिरूनही अनेकांनी रंगांचा आनंद लुटला. रंगपंचमीच्या सेलिब्रेशनमध्ये युवती आणि महिलाही आघाडीवर होत्या. फ्लो
एकंदर, वर्षातून एकदाच येणाऱ्या रंगपंचमीचा नागरिकांनी मनसोक्त आनंद लुटल्याचे यावेळी दिसून आले.


Recent Comments