Belagavi

बेळगावात ‘गो बॅक जगदीश शेट्टर’ मोहीम अधिक तीव्र; स्थानिक नेते बेंगळूरला रवाना

Share

बेळगाव लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या तिकीटासाठी इच्छुक असलेले माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांच्या विरोधात गो बॅक मोहिमेला सोशल मीडियावर यश आले आहे. जिल्ह्याचे नेते राज्य भाजप नेत्यांना भेटण्यासाठी बंगळुरूला गेल्याने आता ती अधिक तीव्र झाली आहे.

माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांना बेळगावमधून उमेदवारी देण्याचा निर्णय भाजपश्रेष्ठिनी घेतल्याची चर्चा सुरु झाल्यापासून स्थानी इच्छुक नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. शेट्टर निवडणूक लढवणार असल्याच्या पार्श्वभूमीवर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर ‘गो बॅक शेट्टर’ मोहीम राबवून अनेक प्रश्न विचारले. तसेच शेट्टर यांच्या उमेदवारीला स्थानिक नेत्यांनीही विरोध व्यक्त केलाय.

आता पुढच्या टप्प्यात बेळगाव भाजपच्या नेत्यांनी राज्य भाजपच्या नेत्यांची भेट घेऊन शेट्टर यांच्या उमेदवारीला जाहीर विरोध करण्याचा निर्धार केला असून बेळगाव विमानतळावरून आज ते बेंगळूरला रवाना झाले. बेंगळूर भेटीत ते भाजप संसदीय मंडळाचे सदस्य बी. एस. येडियुरप्पा, राज्य निवडणूक प्रभारी राधामोहनदास अग्रवाल, भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र, संघटन सचिव जे. व्ही. राजेश यांची भेट घेऊन ‘आम्हाला बाहेरचा उमेदवार नको’ ही आपली भूमिका मांडणार आहेत. ज्यांना प्रदेश नेत्यांकडून आधीच वेळ मिळाली आहे, त्यानुसार ते त्यांची भेट घेऊन प्रदेश नेत्यांना स्थानिकांना तिकीट देण्याचे आवाहन करतील.

राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी, राज्य उपाध्यक्ष अनिल बेनके, महांतेश कवटगीमठ, माजी आमदार संजय पाटील आदी 8 हून अधिक स्थानिक नेते राज्यातील पक्षनेत्यांची भेट घेणार आहेत. प्रदेश नेत्यांच्या प्रतिसादाच्या आधारे पुढील निर्णय जिल्हा नेते घेतील. बेंगळूर भेटीत सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास बेंगळूरहून दिल्लीला जाण्याचीही तयारी त्यांनी केली आहे. त्या परिस्थितीत जिल्ह्यातील नेते दिल्लीला जाऊन पक्षाध्यक्ष जेपी नड्डा किंवा बीएल संतोष यांची भेट घेण्याचा प्रयत्न करतील, अशी माहिती मिळाली आहे.

Tags: