बेळगाव तालुक्यातील अलतगा येथील प्रस्तावित मलबा डेपोला पाच गावच्या ग्रामस्थांनी विरोध केला असून हा प्रकल्प त्वरित रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन आज जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
बेळगाव तालुक्यातील अलतगा येथील सर्व्हे नं. ५५ येथील ५ एकर परिसरात होऊ घातलेल्या प्रस्तावित मलबा डेपोला पाच गावच्या ग्रामस्थांनी विरोध केला असून हा प्रकल्प त्वरित रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन आज मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. अलतगा गावच्या गायरान जागेत मलबा डेपो उभारण्याचे जिल्हा प्रशासनाने ठरविले आहे. तेथे बेळगाव शहरात बांधकामावेळी निर्माण झालेला बांधकाम साहित्याचा मलबा टाकण्याचे नियोजन आहे.
परंतु या जागेत मोठा तलाव असून तेथे अलतगा, कडोली, जाफरवाडी, आंबेवाडी, कंग्राळी खुर्द आदी गावचे शेतकरी आपली जनावरे चारण्यासाठी व पाणी पाजण्यासाठी नेतात. तसेच अनेक लोक सकाळी वायुविहारासाठीही येतात. बेळगाव शहरातील मलबा तेथे टाकल्यास वायू प्रदूषण होऊन पर्यावरणाची हानी होईल अशी भीती आहे. त्यामुळे हा प्रकल्प रद्द करावा अशा मागणीचे निवेदन अलतगा, कंग्राळी खुर्द, कडोली, जाफरवाडी, आंबेवाडी ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

यावेळी बोलताना अलतगा देवस्थान समितीचे अध्यक्ष चंद्रकांत धुडूम व ग्रापं सदस्य चेतक कांबळे यांनी ‘इन न्यूज-आपली मराठी’ला सांगितले की, या परिसरातील गावात हा एकच मोठा तलाव असून त्यात १२ महिने पाणी असते. तेथे मलबा टाकल्यास आम्हा पाच गावांच्या शेतकरी व जनावरांची मोठी गैरसोय होणार आहे. ‘टू पॉईंट ओ’ योजनेत ही जागा मलबा डेपोसाठी संपादित करण्यात येणार असल्याची नोटीस वृत्तपत्रात देण्यात आली आहे. पण आमचा या प्रकल्पाला विरोध असून तो रद्द करावा अशी आमची मागणी आहे.
यावेळी शिवाजी पावशे, पिंटू चौगुले, पिंटू जाधव, सिद्राम दळवी, अनिल पावशे, नारायण पावशे, उमेश चौगुले, रुपेश चौगुले, तुकाराम चौगुले, सोमनाथ आलोजी, हणमंत कंग्राळकर, परशराम चिखलकर, दुर्गाराम पाटील आदी उपस्थित होते.


Recent Comments