या लोकसभा निवडणुकीत राज्यात 20 पेक्षा जास्त जागा जिंकू, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केलाय.
शहरातील एस. जी. बाळकुंद्री तांत्रिक महाविद्यालयाच्या वसतिगृहाच्या कामाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले की, आपण आधीच म्हटल्याप्रमाणे चिक्कोडी आणि बेळगाव लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीसाठी विद्यमान व माजी आमदारांची मते जाणून घेऊ. सर्वांची मते जाणून घेऊन हायकमांडकडे पाठवू, त्यानंतर हायकमांड अंतिम निर्णय घेईल असे सांगितले. यावेळच्या कर्नाटकातील लोकसभेच्या निवडणुकीत किमान २० जागा आम्हीच जिंकू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
इतर पक्षात असमाधानी असलेले नेते आमच्या पक्षात येऊ इच्छित असतील तर ते जर काँग्रेसच्या धोरण आणि तत्त्वांशी सहमत असतील, तर त्यांचे आम्ही पक्षात स्वागतच करू असे ते म्हणाले. भाजप हिंदू धर्मावर राजकारण करतो, आम्ही विकासकामांवर मते मागतो, लोकसभा निवडणुकीची सर्वच पक्षांनी तयारी केली आहे. रामाचा झेंडा सर्वांच्या घरावर आहे, असे ते म्हणाले.
याप्रसंगी काँग्रेस जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी, केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील आदी उपस्थित होते.


Recent Comments