Belagavi

बेळगावला समर्पक पाणीपुरवठा करण्याची भारतीय संस्कृती फौंडेशनची मागणी

Share

बेळगाव शहराला समर्पक पाणीपुरवठा करून महिलांचे त्रास वाचवा, महिलांवरील वाढते अत्याचार रोख अशी मागणी भारतीय संस्कृती फौंडेशनने बेळगाव जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. भारतीय संस्कृती फौंडेशनच्या अध्यक्षा प्रमोदा हजारे यांच्या नेतृत्वाखाली सदस्यांनी आज बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

यावेळी बोलताना माजी नगरसेविका सुधा भातकांडे यांनी सांगितले की, बेळगाव शहराला गेल्या अनेक दिवसांपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ४ ते ८ दिवसांतून एकदा पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे सगळ्यांचे विशेषतः महिलांचे खूप हाल होत आहेत. एल अँड टी कंपनी आणि बेळगाव महापालिकेने याची दखल घेऊन शहराला समर्पक पाणी पुरवठा करावा. सार्वजनिक नळांच्या तुटलेल्या चाव्या बदलून वाया जाणारे पाणी वाचवावे, अनेक लोक मोटार लावून पाणी खेचत आहेत. बोअरवेलचे पाणी गाड्या धुण्यासाठी, बागेला व अंगण साफ करण्यासाठी वापरून त्याचा अपव्यय केला जात आहे. त्यांना व्हॉल्व्हमनकडून सूचना देऊन हा प्रकार बंद करावा अशी मागणी त्यांनी केली.

त्याचप्रमाणे शहरात भूमिगत कुकिंग गॅस पुरवठ्यासाठी अनेक ठिकाणी रस्ते खोदण्यात येत आहेत. तेथे खड्डे निर्माण होऊन पावसाळ्यात लोकांना त्रास होणार आहे. त्यामुळे संबंधित गॅस कंपनीला एकाचवेळी त्या-त्या गल्लीत रस्ते खुदाई करून भूमिगत गॅस वाहिन्या घालून रस्ते दुरुस्त करण्याच्या कडक सूचना द्याव्यात. महिलांवर होणाऱ्या वाढत्या अत्याचारांना आळा घालावा आदी मागण्या त्यांनी केल्या.

यावेळी शिरस्तेदार एम. एस. परगी यांनी निवेदन स्वीकारले. निदर्शनात भारतीय संस्कृती फौंडेशनच्या उपाध्यक्षा गौरी गजबर, जिल्हा सचिव सुनीता सुभेदार, अनुराधा सुतार, मंदा नेवगी, उर्मिला मन्नूरकर, शांता जाधव, रेखा अन्नीगेरी, प्रीती लोहार, अंजना लोहार, वर्षा ठोकणेकर, वैष्णवी मुचंडीकर, सुनीता ओरेवाले, शेवंता तवनोजीचे, संध्या वरूटे यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या.

Tags: