महेश फाऊंडेशनचे समाजसेवेचे कार्य कौतुकास्पद आहे. यमकनमर्डी मतदार संघात 5 एकर जागा महेश फाऊंडेशनला देणार असून मी स्वत: तेथे इमारत बांधून देणार असल्याचे जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते बेळगावजवळील कणबर्गी येथील महेश फाऊंडेशनच्या उत्कर्ष शाळा आणि मायब्लड चॅरिटेबल रक्तपेढीचे उद्घाटन करण्यात आले.
त्यानंतर बोलताना मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले की, महेश फाऊंडेशनच्या कार्याबद्दल अनेकांनी चांगले मत व्यक्त केले आहे. आपली मुले राहुल आणि प्रियंका यानी तुमच्या फाऊंडेशनला भेट दिली आहे, आज मला येथे भेट देऊन आनंद होत आहे. या फौंडेशनला यमकनमर्डी मतदार संघात 5 एकर जमीन मंजूर करून इमारत स्वतः बांधून देणार आहे. येथील मुलांना चांगले शिक्षण मिळाल्यास आम्ही केलेले काम सार्थकी लागेल, असे ते म्हणाले.

गेल्या 15 वर्षांपासून महेश फाऊंडेशन वंचित मुलांना आधार देत आहे. उत्कर्ष शाळेची स्थापना केली जी एचआयव्ही बाधित आणि वंचित मुलांसाठी विशेष शाळा आहे. यासोबतच महेश फाऊंडेशनने मायब्लड चॅरिटेबल रक्तपेढीची स्थापना केली आहे, ज्याचा उद्देश गरजूंना वेळेवर रक्तपुरवठा करणे हा आहे. अशी अनेक समाजोपयोगी कामे करणाऱ्या महेश फाऊंडेशनचे कार्य कौतुकास्पद असून त्यांना आपल्याकडून सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
आमदार राजू सेठ म्हणाले की, मी अनेकवेळा महेश फाऊंडेशनला भेट दिली असून, यावेळीही भेट दिल्याचा आनंद झाला. सतीश जारकीहोळी यांच्या पाठिंब्याने महेश फाऊंडेशन लोकांना आवश्यक असलेल्या अनेक क्षेत्रात आपले कार्य वाढविण्यात यशस्वी व्हावे अशी माझी इच्छा आहे. आगामी काळात महेश फाऊंडेशनला आणखी यश मिळावे अशी मी शुभेच्छा देतो. त्यामुळे त्यांच्या कार्यात माझा सदैव पाठिंबा राहील.
महेश फाऊंडेशनचे संस्थापक महेश जाधव म्हणाले, 640 हून अधिक मुलांना मोफत शिक्षण देण्याचे आमचे स्वप्न होते. आमच्याकडे सर्व सोयीसुविधा होत्या.

मात्र या शाळेला परवानगी मिळवण्यात आम्ही अपयशी ठरलो होतो. सतीश जारकीहोळी यांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले. त्याचप्रमाणे, आमच्या रक्तपेढीसाठी परवाना मिळवून देण्यासाठी त्यांनी आम्हाला मदत केली, ज्याचा फायदा येत्या काळात 18000 गरजू लोकांना होणार आहे. जनतेला नेहमीच मदतीचा हात देणारा असा विनम्र नेता आम्हाला लाभला आहे. या शाळेत येणारी मुले शिक्षणासाठी उपाशी आहेत आणि ती काहीतरी साध्य करतील असा विश्वास आहे, असे ते म्हणाले.
यावेळी महेश फाऊंडेशनचे कर्मचारी, मुले, पालक, शिक्षक, स्वयंसेवक उपस्थित होते.


Recent Comments