बेळगावचे उपनगर असलेल्या अनगोळमधील धर्मवीर संभाजी महाराज चौकापासून रघुनाथ पेठपर्यंतच्या मुख्य रस्त्याचे काम अर्धवट ठेवल्याने येथील रहिवासी व प्रवाशांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. बेळगाव महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे ही परिस्थिती ओढवल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे.
बेळगाव दक्षिण मतदारसंघात येणाऱ्या अनगोळमधील रहिवाशांना मनपा अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाचा फटका बसतोय. येथील धर्मवीर संभाजी महाराज चौकापासून ते रघुनाथ पेठपर्यंतच्या मुख्य रस्त्याचे सुमारे ५०० मीटर्सचे काम अर्धवट सोडण्यात आले आहे. येथून बससुद्धा येऊ शकत नसल्याने अनगोळ गावात आत बस येणे बंद झाले असून, मराठी शाळेजवळच बस थांबविण्यात येत आहे. त्यामुळे मारुती गल्ली, लक्ष्मी गल्ली आदी भागातील नागरिकांना सुमारे एक किमीची पायपीट करत बससाठी शाळेजवळ यावे लागत आहे.
त्याशिवाय या रस्त्याशेजारी राहणाऱ्या नागरिकांना धुळीचा मोठा त्रास सहन करावा लागतोय. धुळीचे प्रमाण इतके वाढले आहे की, लोकांना दिवसरात्र घर-दरवाजासमोर प्लास्टिक बांधावे लागत आहे. त्याशिवाय ऍलर्जी, संसर्गजन्य रोगराईचा सामना करावा लागत आहे. महापालिकेने त्वरित रस्त्याचे काम पूर्ण
करून ही समस्या सोडवावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा येथील रहिवाशांनी दिला आहे. या संदर्भात इन न्यूजला माहिती देताना माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी सांगितले की, सुमारे ६ महिन्यांपूर्वी येथे ड्रेनेजचे काम पूर्ण करण्यात आले. त्यानंतर खोदलेल्या रस्त्याची दुरुस्ती करणे आवश्यक होते. परंतु सुमारे ५०० मीटर्सच्या टप्यातील रस्त्याची दुरुस्ती न केल्याने येथे धुळीचे लोट निर्माण होत असून सगळ्या घरांमध्ये धूळ साचत आहे.
त्यामुळे लोकांना ऍलर्जी व संसर्गजन्य रोगांचा सामना करावा लागत आहे. याबाबत आम्ही महापौर व पालिका आयुक्तांना निवेदन देऊन रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली होती. पण त्याकडे गांभीर्याने पाहिलेले नाही. एखादा मंत्री, व्हीआयपी येणार असेल तर मनपा अधिकारी रातोरात रस्ता निर्माण करतात. पण या नागरी वस्तीत ६-६ महिने रस्ता खोदून ठेवून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळण्यात येत आहे. या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करून ही समस्या सोडवली नाही तर महापालिकेच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला.

येथील भाऊ कावळे व आणखी एका रहिवाशाने सांगितले की, स्मार्टसिटी म्हणून सगळीकडे चांगले रस्ते बनवणाऱ्या बेळगाव महापालिकेने आमच्या रस्त्याच्या दुरुस्तीकडे का दुर्लक्ष केले हेच समजत नाही. धर्मवीर संभाजी महाराज चौक ते रघुनाथ पेठ हा अनगोळमधील एक प्रमुख रस्ता आहे. त्याचे डांबरीकरण केलेले नाही. अपूर्ण रस्त्यामुळे आम्हाला धूळ व अन्य समस्यांचा सामना करावा लागत आहे. ज्येष्ठ नागरिकांना तसेच मुले व महिलांना श्वसनाचा त्रास होत आहे.
याची दखल घेऊन मनपाने त्वरित रस्ता दुरुस्त करून आम्हाला दिलासा द्यावा, अन्यथा आम्ही जोरदार आंदोलन छेडू असा इशारा त्यांनी दिला.
रस्ता दुरुस्त न केल्याने धुळीची समस्या तर निर्माण झालीच, पण गावची बससेवाही बंद पडल्याने महिलांनीही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. धुळीमुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व गरोदर महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दिवसभर धूळ घरात शिरून स्वयंपाक घरापर्यंत पोहोचत आहे.
त्यामुळे आम्हाला घरांसमोर प्लॅस्टिकची तावदाने बांधावी लागत आहेत. अर्धवट रस्त्यामुळे बसेस गावात आत येत नाहीत. मराठी शाळेजवळच थांबतात. त्यामुळे महिलांना व ज्येष्ठ नागरिक आणि विध्यार्थ्यांना पायपीट करावी लागते. त्यामुळे त्यांचा वेळ खर्च होऊन शारीरिक त्रास भोगावे लागत आहेत. लक्ष्मी गल्ली, मारुती गल्ली आदी अंतर्गत भागातील रहिवाशांना एक किमी पायपीट करून मराठी शाळेजवळ येऊन बस पकडावी लागत आहे. महापालिकेने तातडीने रस्त्याची ही समस्या दूर करावी अन्यथा आम्ही आवाज उठवू असा इशारा महिलांनी दिला.
एकंदर, अपूर्ण रस्त्यामुळे अनगोळवासीय मोठ्या संकटात सापडले आहेत. ही समस्या न सोडविल्यास आंदोलन छेडण्याचाही इशारा त्यांनी दिलाय. निदान आता तरी बेळगाव महापालिका जागे होऊन त्यांची समस्या सोडविणार का हे पाहावे लागेल.


Recent Comments