नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत यासाठी प्रचारासाठी बुलेटवरून देशभ्रमण करणाऱ्या तामिळनाडूच्या राणी राजलक्ष्मी वांडा यांचे बेळगावातील किल्ला दुर्गा देवी मंदिरात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले.
बुलेट क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेल्या राजलक्ष्मी यांनी भारताला बलवान, विश्वगुरू बनवण्यासाठी नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत यासाठी तमिळनाडू ते दिल्ली अशी बुलेटवरून मोहीम सुरु केली आहे. 18 फेब्रुवारी रोजी मूळ गाव मदुराई, तामिळनाडू येथून बुलेट जथ्याला सुरुवात केली. तामिळनाडू, केरळ आणि तेलंगणा राज्यांचा प्रवास पूर्ण केल्यानंतर, राजलक्ष्मी यांचे आज शनिवारी बेळगावमध्ये आगमन झाले. अशोक चौकातील किल्ला दुर्गादेवी मंदिरात भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचे आरती करून स्वागत केले.

यावेळी बोलतांना राजलक्ष्मी म्हणाल्या की, तरुण आणि महिला मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने बुलेट यात्रा सुरू करण्यात आली असून, तिला सर्वत्र उदंड पाठिंबा मिळत आहे. ६५ दिवसांत १५ राज्यातून २० हजार किमीचा प्रवास करून १२ एप्रिलला नवी दिल्ली गाठून पंतप्रधानांना भेटायचे आहे. तामिळनाडू, केरळ आणि तेलंगणा राज्यांचा प्रवास पूर्ण केल्यानंतर आज बेळगावात पोहोचले असून येथून गोव्यात आणि त्यानंतर महाराष्ट्रात जाणार आहे. मोदींना पुन्हा पंतप्रधान करून देशाचे भविष्य सुरक्षित करायचे आहे. भारताला विश्वगुरू करण्याचे काम मोदीच करू शकतात. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत सर्व मतदारांनी भाजपलाच मतदान करून मोदींचे हात बळकट करावेत असे आवाहन राजलक्ष्मी यांनी केले.
यावेळी भाजप युवामोर्चा जिल्हाध्यक्ष महादेव दरेन्नावर, विजय कोडगनूर यांच्यासह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments