महाशिवरात्रीनिमित्त बेळगावातील दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरांमध्ये आज हजारो भक्तांनी भगवान शंकराचे दर्शन घेऊन प्रार्थना केली. यानिमित्त विशेष रूद्राभिषेक, होम हवन व पूजेचे आयोजन करण्यात आले. काल रात्रीपासूनच शहर-परिसरातील भाविकांनी मंदिरांमध्ये जाऊन बिल्वपत्र, तुळशी, फुले, फळे, अर्पण केली.
दरवर्षीप्रमाणे यंदाही बेळगाव येथील कपिलेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भगवान शंकराची रुद्राक्ष पूजा बांधण्यात आली. बेळगाव शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या दक्षिण काशी मानल्या जाणाऱ्या कपिलेश्वर मंदिरात कपिलनाथाचे दर्शन घेण्यासाठी शहर व परिसरातील भाविकांचा भला मोठा जनसागर लोटला होता. अनेक भाविकांनी शिस्तबद्धरीत्या रांगेत येऊन दर्शन घेऊन भगवान शंकराचा आशीर्वाद घेतला. दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरात शिवनामाचा जप आणि उपवास करून फळे व नैवेद्य दाखवून महाशिवरात्रीनिमित्त विशेष पूजा करण्यात आली.
यानिमित्ताने कपिलेश्वर देवस्थानचे विश्वस्त राजेश कलघटगी यांनी इन न्यूजशी वार्तालाप करताना सांगितले की, हा दिवस विशेषत: शिवरात्रीनिमित्त सर्व भक्तांचे भले व्हावे, या भावनेने सर्वांनी भगवान शिवाची प्रार्थना केली. अनेक भाविकांनी येऊन त्रिकालेश्वर भगवान शिवापुढे शांतपणे नतमस्तक होऊन नमन केले. भाविकांना सुलभपणे दर्शन घेता यावे यासाठी मंदिर समितीने विशेष व्यवस्था केली. त्यामुळे कसलाही गोंधळ गडबड न होता सर्वांना दर्शन घेता आले.

इन न्यूजशी बोलताना शिवभक्तांनी सांगितले की, दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या कपिलेश्वर मंदिरात आज गर्दीचा महापूर लोटला आहे. भक्तिभावाने येथे चैतन्यमय वातावरण निर्माण झाले आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आम्ही उपवास करून मंदिरात शंकराची विशेष पूजा केली आहे, असे त्यांनी सांगितले.
इनन्यूजशी बोलताना एका भाविक महिलेने सांगितले की, मी काल रात्रीपासून उपवास धरून शिवाचे नामस्मरण केले आणि आज कपिलेश्वर मंदिरात शिवाचे दर्शन घेण्यासाठी आले. कपिलेश्वर मंदिरात असंख्य भाविकांनी विशेष महापूजेसाठी उपस्थित राहून शिवाराधना केली. यावेळी कपिलेश्वर मंदिराच्या ट्रस्टींनी दर्शनासाठी विशेष व्यवस्था केली होती. त्यामुळे सर्व भाविकांना मनोभावे दर्शनाचा लाभ घेता आला.


Recent Comments