Belagavi

पाणी समस्येवर तोडगा काढण्याची माजी नगरसेवकांची मागणी

Share

बेळगाव शहराच्या पाणी समस्येवर तोडगा काढण्याची मागणी माजी नगरसेवकांच्या संघटनेने केली आहे. बेळगावातील माजी नगरसेवकांच्या संघटनेने शहरातील पाणीटंचाईवर मात करून ही समस्या सोडवण्याची मागणी केली आहे. काल गुरुवारी माजी महापौर शिवाजी सुंठकर यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेवकांच्या संघटनेच्या सदस्यांनी बेळगाव महापालिकेला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी महापौर सविता कांबळे, उपमहापौर आनंद चव्हाण, सत्ताधारी गटनेते गिरीश धोंगडी, विरोधी गटनेते मुजम्मिल डोणी यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

यावेळी माजी महापौर वंदना बेळगुंदकर, माजी नगरसेवक नेताजी जाधव, शिवनगौडा पाटील, मोहम्मद रसूल पिरजादे, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर तसेच विद्यमान नगरसेवक-नगरसेविका उपस्थित होते. उपस्थित होते.  यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना माजी महापौर शिवाजी सुंठकर म्हणाले की, आज आम्ही माजी नगरसेवक संघटनेच्या वतीने महापौर, उपमहापौर, सत्ताधारी व विरोधी गटनेत्यांनी भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. त्याशिवाय बेळगावची पाणीसमस्या सोडविण्याचे आवाहन केले आहे. बेळगाव शहराला २४ तास पाणीपुरवठा करणे अपेक्षित असताना कधी ४ दिवसातून तर कधी ८ दिवसातून पाणी पुरवण्यात येत आहे.

राकसकोप आणि हिडकल जलाशयात पुरेसा पाणीसाठा असतानाही बेळगाव शहराला समर्पक पाणी पुरवले जात नाही. याबाबत महापौर, उपमहापौरांनी जातीने लक्ष घालून ही समस्या सोडवावी. यासंदर्भात माजी नगरसेवक संघटनेतर्फे काही मार्गदर्शन व सहकार्य हवे असल्यास ते करण्याची तयारी आम्ही दाखविल्याचे त्यांनी सांगितले. महापौर, उपमहापौर व दोन्ही गटाच्या नेत्यांनी सत्कार स्वीकारून पाणीसमस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.

Tags: