उन्हाळा सुरू झाला किंवा परीक्षा संपल्या की सगळीकडे बालकांसाठी उन्हाळी शिबिरांचे आयोजन करण्यात येते. पण बेळगावातील संजीवीनी फौंडेशनकडून प्रथमच ज्येष्ठांसाठी उन्हाळी शिबिर भरवण्यात आले आहे.
सोमवार दि ४ मार्च रोजी याची सुरुवात आदर्शनगर येथील संस्थेच्या कार्यालयात करण्यात आली. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर उदघाटक म्हणून ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे चेअरमन ऍड चंद्रहास अणवेकर, प्रमुख पाहुण्या म्हणून जी जी चिटणीस स्कुलच्या मुख्याध्यापिका डॉ नविना शेट्टीगार, सीईओ मदन बामणे, संस्थेच्या संस्थापिका डॉ. सविता देगीनाळ, डॉ. सुरेखा पोटे, संचालिका रेखा बामणे उपस्थित होत्या.

प्रास्ताविकात डॉ. देगीनाळ म्हणाल्या की, दररोज वेगवेगळ्या पद्धतीने चित्रकला, पेंटिंग, नृत्यकला, तसेच विविध खेळ आयोजित करून त्यातून उत्कृष्ट कला सादरीकरण करणाऱ्याना बक्षिसे दिली जातात. तसेच एक दिवस सहलीचे आयोजन करण्यात येते.
उदघाटक ऍड. चंद्रहास अणवेकर तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून शिबिराचे उदघाटन करण्यात आले. ऍड. अणवेकर यांचा शाल स्मृतिचिन्ह आणि भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. यावेळी ऍड. चंद्रहास अणवेकर व नविना शेट्टीगार यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप करताना मदन बामणे यांनी पुढील वर्षांपासून हे उन्हाळी शिबिर फक्त फौंडेशनपुरते मर्यादित न ठेवता बाहेरील जेष्ठ नागरिकांसाठी सुध्दा आयोजित करण्याचा मानस असल्याचे सांगितले.

पहिल्या दिवशी मटके रंगवण्याची स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत चोवीस स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. स्वागत जयश्री ढवळी यांनी तर सूत्रसंचालन सरिता सिद्दी यांनी केले. विजयालक्ष्मी पाटील यांनी आभार मानले.


Recent Comments