Belagavi

व्यंकटेश्वरा काजू प्रक्रिया कारखान्याची वास्तुशांती, रुद्राभिषेक पूजन उत्साहात

Share

महाराष्ट्रातून येऊन येथील शेतकऱ्यांसाठी काजू कारखाना सुरू करणे हे स्वागतार्ह आहे. आतापर्यंत येथील शेतकऱ्यांकडून काजू खरेदी करून महाराष्ट्रात नेला जात होता. मात्र दलाल शेतकऱ्यांची फसवणूक करत होते. आता येथे व्यंकटेश्वरा को-ऑप पॉवर अँड ऍग्री प्रोसेसिंग कारखाना सुरू होत असल्याने त्याचा फायदा येथील शेतकऱ्यांना होणार आहे, ही समाधानाची बाब आहे, असे उद्गार महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी काढले.

बेळगाव-राकसकोप मार्गावरील बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील कल्लेहोळ फाट्यावरील व्यंकटेश्वरा काजू प्रक्रिया कारखान्याच्या वास्तुशांती आणि रुद्राभिषेक पूजन कार्यक्रमात सहभागी होऊन त्या बोलत होत्या. तब्बल १५ हजारांहून अधिक सभासदांच्या उपस्थितीत रविवारी हा भव्य सोहळा पार पडला.

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर पुढे म्हणाल्या की, शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यास कोणताही उद्योग वाढू शकत नाही. त्यामुळे कोणाचाही विश्वास न गमावता आणि कोणाला त्रास न देता सचोटीने व्यवसाय चालवा, असे आवाहन केले. बेळगावमधून संस्थेचे संचालक निवृत्त नायब सुभेदार यल्लाप्पा झंगरुचे यांनी आपल्या ग्रामीण भागातील सर्व निवृत्त सैनिकांना एकत्र आणून जवान आणि किसान यांच्यासाठी उत्कृष्ट काम केले आहे. माझ्या ग्रामीण मतदारसंघात शेती आणि शेतकरी विखुरलेला आहे. एक सच्चा प्रामाणिक आणि एकवचनी अशी येथील शेतकऱ्यांची ख्याती आहे. या शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी व्यंकटेश्वरा को-ऑप पॉवर अँड ऍग्री प्रोसेसिंग या संस्थेने सुरु केलेल्या विविध उपक्रमांचे मी मनापासून कौतुक करते.

नाशिक येथील आचार्य १००८ महामंडलेश्वर स्वामी संविदानंद सरस्वती महाराज यांच्या दिव्य सानिध्यात हा समारंभ झाला. इन न्यूज आपली मराठीशी बोलताना ते म्हणाले की, व्यंकटेश्वरा को-ऑप पॉवर अँड ऍग्री प्रोसेसिंग या कारखान्याचे कार्य आजपासून सुरु होतेय ही खूप अद्भुत, अवर्णनीय बाब आहे, संस्थापक शिवाजी डोळे यांनी ‘जय जवान, जय किसान’ हा नारा देतानाच त्याला ‘जय अनुसंधान, जय विज्ञान’ अशी जोड दिली आहे. जवान मरेपर्यंत जवानच राहतो आणि शेतकरीही मरेपर्यंत शेतकरीच राहतो. जवान आणि किसान आपापल्या परीने जन्मभूमीची सेवा करतात. या दोघांच्याही जीवनात सुख, समाधान आणण्यासाठी शिवाजी डोळे यांनी सुरु केलेले कार्य प्रशंसनीय आहे. इतक्या कमी अवधीत त्यांनी या कारखान्याची उभारणी केली, अतिरुद्र महायज्ञ सारखा यज्ञ त्यांनी सहजतेने यशस्वी केला, त्यावेळी अवघ्या दोनच मिनिटात अग्निमंथनातून अग्निदेव प्रकट झाले. यावरूनच भगवंताचा या कार्याला आशीर्वाद आहे हे सिद्ध होते. देवाची अशीच असीम कृपा त्यांच्यावर राहो आणि या उद्योगाचा जगभरात विस्तार, नावलौकिक होवो अशा शुभेच्छा स्वामीजींनी दिल्या.

कारखाना उदघाटनानिमित्त बोलताना चेअरमन संस्थापक निवृत्त ब्लॅक कॅट कमांडो शिवाजी डोळे म्हणाले की, ‘सहकारातून समृद्धी’ या तत्वातून आम्ही महाराष्ट्रातील नाशिकजवळील अजंगवडेल मालेगाव येथून आमच्या कार्याचा श्रीगणेशा केला. ५२८ एकर जागेत आम्ही शेतकरी व निवृत्त जवानांच्या सहकार्याने सेंद्रिय शेती करत असून, फळा-फुलांची लागवड करून युरोपला उत्पादने निर्यात करत आहोत. कर्नाटकात कार्याचा विस्तार करताना, सर्व्हेवेळी शेतकऱ्यांनी आम्हाला बेळगाव भागात काजूचे उत्पादन अधिक होते, त्यासाठी काय करणार असे विचारले.

त्यावर लगेचच आम्ही येथे काजू प्रक्रिया प्रकल्प उभारून तुमच्या काजू उत्पादनाला योग्य भाव देतो असे सांगितले. त्यानुसार अवघ्या ५ महिन्यांपूर्वी भूमिपूजन करून प्रतिदिन २०-३० टन प्रक्रिया क्षमता असलेला कर्नाटकातील एकमेव असा सहकार क्षेत्रामधील काजूप्रक्रिया कारखाना उभारला आहे. गेल्या २-३ वर्षांत शेतकरी-जवानांनी आम्हाला खूप सहकार्य केले आहे. यातून त्यांना स्वतःचे व्यासपीठ मिळाले आहे. असेच कृषी आधारित प्रकल्प आम्ही अन्यत्रही उभारणार आहोत. यातून शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव, जवानांना आणि सुशिक्षित बेरोजगारांना उद्योजक बनण्याची संधी मिळेल. यासाठी सहकार्य केलेल्या सर्वांचे त्यांनी मनपूर्वक आभार मानले.

निवृत्त लेफ्टनंट जनरल दिलीप देसाई म्हणाले की, संस्थापक शिवाजी डोळे यांची दूरदृष्टी आणि सर्वांच्या सहकार्याने अवघ्या ५ महिन्यांपूर्वी भूमिपूजन झालेल्या व्यंकटेश्वरा कारखान्याची इमारत आज उभी राहिली आहे. मशिनरी आल्या आहेत. माजी सैनिक आणि शेतकऱ्यांनी मिळून काम केल्याने काय होऊ शकते याचे हे एक अत्यंत चांगले, सकारात्मक उदाहरण आहे. त्यांच्या कार्याचा असाच सर्वत्र विस्तार व्हावा अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

या कार्यक्रमाला बेळगावसह खानापूर, हुबळी, धारवाड विभाग, हावेरी, बैलहोंगल, चिकोडी, बागलकोट, गडहिंग्लज, नाशिक, पुणे, कोल्हापूर आदी ठिकाणांहुन नागरिक उपस्थित होते. या संस्थेचे महाराष्ट्र आणि कर्नाटकातून सर्व कोअर कमिटी मेम्बर्स आणि सल्लागार यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. या सर्वांच्या साक्षीने शिवमंदिरामध्ये पूजा करून व्यंकटेश्वरा काजू प्रोसेसिंग फॅक्टरीचा वास्तुशांती आणि महापूजन सोहळा पार पडला. संस्थेचे सभासद वर्ग, आणि शेतकरीवर्ग यांचे संस्थेचे ऑपरेशनल हेड अनिल पांडे यांनी सर्वांचे उपस्थित राहिल्याबद्दल मनपूर्वक आभार मानले.

Tags: