Belagavi

कॉक्लीअर इम्प्लांटबाबत केएलईचा कर्नाटक सरकारसोबत करार

Share

जागतिक मूकबधिर दिनाचा एक भाग म्हणून 3 मार्च रोजी लहान मुलांना मोफत कॉक्लीअर इम्प्लांट शस्त्रक्रिया उपलब्ध करून देण्यासाठी केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि कर्नाटक सरकारसोबत करार होणार आहे.

केएलई संस्थेच्या जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाच्या (जेएनएमसी) ईएनटी विभागाच्या प्रा. डॉ. प्रिती हजारे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही माहिती देऊन सांगितले की, लहान मुलांना मोफत कॉक्लीअर इम्प्लांट शस्त्रक्रिया उपलब्ध करून देण्यासाठी केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि कर्नाटक सरकारसोबत करार होणार आहे. श्रवण आणि वाचा दोष असलेल्या मुलांवर केएलई हॉस्पिटलमध्ये कॉक्लियर इम्प्लांट सर्जरी करण्यात येत आहेत. 2022पासून डॉ. प्रभाकर कोरे केएलई हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत 16 मुलांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. शस्त्रक्रिया झालेल्या मुलांना सहा महिने ते एक वर्षांपर्यंत स्पीच थेरपी दिली जाते. त्यांना श्रवणशक्तीने बोलण्याचे प्रशिक्षण दिले जाते, असे त्यांनी सांगितले.

लहान वयातच श्रवण-वाचादोष असलेल्या मुलांवर कॉक्लीअर इम्प्लांट शस्त्रक्रिया करणे गरजेचे असते. यासाठी १० महिने किंवा १ ते ६ वयोगट अतिशय योग्य आहे. या वयात कॉक्लीअर इम्प्लांट शस्त्रक्रिया केल्याने मुलांना स्पीच थेरपी कमी द्यावी लागते. समोरील बोलणाऱ्यांच्या ओठांच्या हालचालींवरून मूल बोलण्याचा प्रयत्न करते. त्यांना ओडीटरी व्हर्बल थेरपी अर्थात स्पीच थेरपी देऊन बोलणे शिकवले जाते. या वयातच कॉक्लीअर इम्प्लांट केल्याने मुलांची वाचा व श्रवणशक्ती सामान्य पद्धतीने वाढते. केएलई हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया आणि स्पीच थेरपी दोन्ही मोफत केले जाते. कर्नाटकात केवळ ५-६ हॉस्पिटल्समध्ये ही सेवा उपलब्ध आहे. पण बाहेर स्पीच थेरपीसाठी पैसे आकारण्यात येतात. गेल्या दोन वर्षांत १६ शस्त्रक्रिया केएलई हॉस्पिटलमध्ये यशस्वी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी पालक मधुर गुरसे यांनी सांगितले की, आपली मुलगी आरोही हिला वाचा व श्रवण दोष असून, केएलई हॉस्पिटलमध्ये तिच्यावर कॉक्लीअर इम्प्लांट शस्त्रक्रिया करून स्पीच थेरपी देण्यात येत आहे. तिच्यात लक्षणीय बदल दिसून आले असून, शस्त्रक्रिया यशस्वी ठरली आहे, ही पाल्कम म्हणून आमच्यासाठी दिलासादायक बाब आहे. यावेळी जेएनएमसी ईएनटी विभागाचे डॉक्टर उपस्थित होते.

Tags: