जिल्ह्यातील बहुतांश भागात उन्हाळ्याच्या प्रारंभीच पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. तथापि, खानापूर तालुक्यातील इटगी गावातील ग्रामस्थ मात्र निवांत आहेत. गावातील जावळ तलावाचे पुनर्भरण करून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवल्याबद्दल ग्रामस्थांनी इटगी ग्रामपंचायतीचे आभार मानले आहेत.
गेल्या काही वर्षांत कमी पाऊस आणि कडक उन्हाळ्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी दुष्काळाचे सावट आहे. त्या सर्व भागात पिण्याच्या पाण्याची कमतरता ही एक सामान्य समस्या आहे. इटगी गावातील ग्रामस्थांनाही हीच समस्या भेडसावत होती. मात्र ती कायमस्वरूपी सोडविण्यासाठी इटगी ग्रापंचे अध्यक्ष रुद्रप्पा तुरमुरी यांच्या नेतृत्वाखाली तलावाचे पुनर्भरण करण्यात आले आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यातही हा तलाव तुडुंब भरून वाहतोय.
यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना इटगी ग्रापंचे अध्यक्ष रुद्रप्पा तुरमुरी म्हणाले की, भूतकाळातील कठीण दिवसांनी आम्हाला चांगले भविष्य घडवण्याचा धडा शिकवला आहे. इटगीच्या ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांच्या गावकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी हे कार्य केले, असे ते म्हणाले. मागील वर्षीच्या उन्हाळ्यातही ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला. काही वर्षांपूर्वी जलनिर्मल प्रकल्पांतर्गत पाण्याची समस्या सोडविण्यासाठी मलप्रभा नदीपासून सुमारे दीड किमी अंतरावरील गावात पाइपलाइन टाकण्यात आली होती. परंतु काही अपरिहार्य कारणांमुळे योजना फसली

इटगीच्या आसपास तीन तलाव असले तरी उन्हाळ्यात सर्व तलाव कोरडे पडतात. यानंतर, विहिरी आणि कूपनलिका यांच्या पाण्याची पातळी कमालीची घसरते आणि त्यामुळे प्रचंड गैरसोय होते, असे ते म्हणाले. तालुका पंचायतीचे माजी सदस्य व इटगीचे रहिवासी बसवराज सानिकोप्पा यांनी सांगितले की, जल निर्मल योजनेंतर्गत नदीपासून गावापर्यंत पाइपलाइन टाकण्याची योजना आखण्यात आली आहे. त्यानुसार त्या जुन्या जीर्ण पाईपलाईनची दुरुस्ती करण्यात आली असून मलप्रभा नदीतून इटगीपर्यंत पाणी उपसण्यासाठी १५ एचपी क्षमतेचा पाण्याचा पंप बसविण्यात आला आहे, असे ते म्हणाले.
तलाव पुनर्भरणादरम्यान नदीचे पाणी गावातील जावळ तलावात भरून त्याचे जलाशयात रुपांतर झाल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर तलावाची पाण्याची पातळी राखता आली आणि कोरड्या विहिरी आणि बोअरवेलचे पुनर्भरण सुरू झाले, त्यानंतर गावाला पाणीपुरवठा करण्यापूर्वी पाणी फिल्टर करण्यासाठी तलावासोबत फिल्टर युनिट बसवण्यात आले. 20 हजारांहून अधिक ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्याचे त्यांनी सांगितले. एकंदर, भूतकाळातील कडू आठवणींनी इटगी ग्रापंने धडा घेत तलाव पुनर्भरण करून ग्रामस्थांना पाणीटंचाईच्या समस्येतून बाहेर काढले आहे, हे कौतुकास्पद कार्य म्हणावे लागेल.


Recent Comments