मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान ‘कावेरी’ येथे आज दुर्मिळ परिस्थिती पाहायला मिळाली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अवयवदान करणाऱ्यांच्या कुटुंबियांना कौतुकाचे पत्र देऊन सांत्वन व धैर्य दिले.
अपघातात मृत्युमुखी पडलेल्या शरवनच्या पत्नीच्या डोळ्यात आपल्या दिवंगत पतीच्या स्मरणार्थ प्रशंसापत्र स्वीकारताना पाणी आले. रामनगर येथील के.जी. नवीनच्या मृत्यूबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्याच्या कुटुंबीयांना न्याय देण्याचे आश्वासन दिले. अवयवदान केलेल्यांच्या कुटुंबीयांची प्रशंसा करताना सिद्दरामय्या म्हणाले, तुम्ही घेतलेला निर्णय हा सोपा नाही. पण तुम्ही इतरांचे प्राण वाचवण्याचे काम केले आहे, असे कौतुकाचे शब्द त्यांनी सांगितले. तुम्हाला कोणत्याही प्रसंगाला सामोरे जावे लागले तरी आम्ही तुमच्यासोबत आहोत, अशी ग्वाही त्यांनी दिली.

आपल्या मागील कार्यकाळातील अवयव दान संस्थेच्या स्थापनेची आठवण करून देत मुख्यमंत्र्यांनी जास्तीत जास्त लोकांनी अवयवदानासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री दिनेश गुंडूराव यांनी समारंभात प्रास्ताविक करताना सांगितले की, अवयव दानासाठी नोंदणी केलेल्यांची संख्या ८ हजारांहून अधिक असून गेल्या वर्षभरात केवळ १७८ अवयवदान झाले आहे. अवयवदानात कर्नाटक देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. पण ही संख्या वाढवायला हवी. यासंदर्भात लोकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी अवयवदान करणाऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रशस्तीपत्र देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्य़ांमध्ये पालकमंत्री किंवा जिल्हाधिकारी यांच्याहस्ते अवयवदात्यांच्या कुटुंबीयांना प्रशंसापत्र देणार आहेत. अवयवदानातून एक व्यक्ती आठ जणांना जीवनदान देऊ शकते, असे ते म्हणाले. कृषी मंत्री चेलुवरायस्वामी, आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे प्रधान सचिव टी.के. अनिल कुमार आणि आरोग्य आयुक्त डी. रणदीप आदी उपस्थित होते.


Recent Comments