पोलीस विभागाची सेवा ही आपल्यासाठी देवाचा आशीर्वाद आहे. प्रामाणिकपणा, सकारात्मक दृष्टीकोन आणि लोकांचे भले करण्याची इच्छा असेल तर पद कोणतेही असो, यश, प्रसिद्धी आणि समाधान हे आपोआप येते, असे मत सेवानिवृत्त पोलीस आयुक्त एस. एन. सिद्रामप्पा यांनी व्यक्त केले.
बेळगावचे पोलिस आयुक्त एस. एन. सिद्रामप्पा यांच्या सेवानिवृत्तीच्या पार्श्वभूमीवर येथील डॉ. जिरगे सभागृहात पोलीस व विविध मान्यवरांनी त्यांना निरोप दिला. एस. एन. सिद्रामप्पा दाम्पत्याची पुलिंग आऊट परेड म्हणजेच खुल्या जीपमधून मिरवणूक काढण्यात आली. कार्यक्रमात बोलताना एस. एन. सिद्रामप्पा म्हणाले की, बेळगावातील जनतेने आणि जिल्हा प्रशासनाने मला खूप सहकार्य केले, लोकभावनेने काम करणे माझ्यासाठी सोयीचे होते, अधिवेशन काळातही सर्वांनी मला भरभरून आवश्यक ते सर्व सहकार्य केले.
एसपी डॉ. भीमाशंकर गुळेद म्हणाले की, माझ्या 10 वर्षांच्या कार्यकाळात सिद्रामप्पा यांच्यासोबत पहिल्यांदाच एवढा भव्य कार्यक्रम पाहणे हा मला आनंद वाटतो.

श्रमिक पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप कुरंदवडे यांनी सांगितले की, सिद्रामप्पा यांनी आयुक्तपद स्वीकारल्यानंतर पोलीस विभागाचे डिजीटलायझेशन केले, फेसबुक आणि यूट्यूबवर पोलिसांनी केलेल्या कामाची प्रशंसा केली आणि जनतेला पोलीस मित्र बनवले. जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले की, सिद्रामप्पा यांनी जिल्हा प्रशासनाला प्रत्येक कामात सहकार्य केले आहे, त्यामुळेच सुवर्णसौधमध्ये विधिमंडळ अधिवेशन यशस्वीपणे पार पडले.
यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील, एसपी डॉ. भीमाशंकर गुळेद, डीसीपी जगदीश रोहन, स्नेहा पी. व्ही, इंटेलिजन्स एसपी महानिंग नंदगावी, दिलीप कुरंदवडे यांच्यासह पोलीस व विविध खात्यांचे अधिकारी व समाजाच्या विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments