होय-नाही म्हणत अखेर निगम-मंडळावर 44 अध्यक्षांची नियुक्ती करून राज्यातील काँग्रेस सरकारने काल रात्री आदेश जारी केला. पण या 44 जणांच्या यादीत राज्यातील सर्वात मोठा असलेल्या बेळगाव जिल्ह्याची निराशा झाली आहे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्वाक्षरी केलेल्या महामंडळ निगमच्या अध्यक्षांच्या 44 जणांच्या यादीत बेळगाव जिल्ह्यातील कोणालाही स्थान मिळालेले नाही. भौगोलिकदृष्ट्या बलाढ्य बेळगाव जिल्ह्यात 15 तालुके आणि 18 विधानसभा मतदार संघ आहेत. काँग्रेस सरकारने काँग्रेस कार्यकर्त्यांना मोठा धक्का दिला आहे. यादी जाहीर झाल्यानंतर बेळगाव जिल्ह्यातील इच्छुक काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांची घोर निराशा झाली आहे.
बेळगाव जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांमधील अंतर्गत कलहामुळेच बेळगाव जिल्ह्यातील बेळगाव नगरविकास प्राधिकरण अर्थात बुडा आणि कमांड एरिया डेव्हलपमेंट ऍथॉरिटी अर्थात काडा या महामंडळांच्या दोन्ही अध्यक्षांची नावे जाहीर न करता प्रलंबित ठेवल्याचे स्प्ष्ट झाले आहे. यावरून बेळगाव जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांतील मतभेद अजूनही जिवंत असल्याचे सिद्ध होते. सरकारने जाहीर केलेली यादी पाहून बेळगाव जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
बुडा आणि काडा अध्यक्षांच्या नियुक्तीवरून सुरू असलेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पदांवर निवड प्रलंबित ठेवण्यात आली आहे. बेळगावच्या काँग्रेस कार्यकर्त्यांना आता जिल्ह्य़ातील कलह संपतो की नाही, अशी चिंता लागून राहिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला राज्यातील बड्या काँग्रेस नेत्यांनी बेळगाव जिल्ह्यावर अन्याय केला आहे, अशी भावना व्यक्त होत आहे.


Recent Comments