विधानसौधमध्ये पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्याचे पडसाद विधानसभेप्रमाणेच विधान परिषदेतही उमटले. सदनात यावरून भाजप आणि काँग्रेस सदस्यांमध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली.
विधान परिषदेचे कामकाज सकाळी १० वाजता सुरू होताच परिषदेचे भाजप सदस्य एन. रविकुमार यांनी हा मुद्दा उपस्थित केला. यावेळी त्यांच्या ‘देशद्रोही सरकार’ या वक्तव्याने काँग्रेस सदस्य संतप्त झाले. या मुद्द्यावरून गदारोळ झाला आणि काँग्रेस सदस्य अब्दुल जब्बार यांनी रविकुमार यांच्यावर ‘ए तोंड बंद कर’ असा एकेरी शब्दप्रयोग केला.
त्यामुळे संतप्त झालेल्या भाजप सदस्यांनी एकेरी वचनात बोलणे योग्य होणार नाही, असे सांगितले. नंतर रविकुमार उठून सभागृहातील हौद्यात उतरले. तुलसी मुनिराजू गौडाही त्यांच्यासोबत गेले. दोन्ही बाजूचे सदस्य सभापतींच्या खुर्चीसमोर जमले आणि त्यांच्यात जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मार्शल पुढे सरसावले. यावेळी कायदा मंत्री एच. के. पाटील यांनी मध्यस्थी करून दोन्ही बाजूंना शांत केले. आणि माफी मागण्याचा सल्ला दिला. यासाठी एन. रविकुमार मी देशाच्या वतीने बोललो, माफी मागायची गोष्ट आहे का? असे म्हणाले.
अब्दुल जब्बार म्हणाले की, मी तुमच्यामार्फत जे बोललो ते शब्द परत घेतो. त्यानंतर वातावरण शांत झाले.


Recent Comments