दिल्लीत शांततेत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अटकेचा निषेध करत बेळगावात कर्नाटक राज्य रयत संघटना आणि हसिरू सेना संघाच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने केली.
बेळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात राज्य रयत संघटना आणि हसिरू सेनेच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने केली. दिल्ली येथे शांततेत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अटकेचा निषेध करत हे आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
शेतकऱ्यांनी पिकवलेल्या पिकांना शास्त्रोक्त भाव निश्चित करावा यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेच्या मागणीसाठी दिल्लीतील शेतकऱ्यांचे आंदोलन केंद्र सरकार दडपून टाकत आहे, हे निंदनीय आहे. निमलष्करी दलाकडून शेतकऱ्यांना अटक करणे हे मानवी हक्कांचे उल्लंघन आहे. त्यामुळे केंद्र सरकारने शेतकऱ्यांची माफी मागावी. शेतकऱ्यांनी केलेली सर्व कृषी कर्जे, बँक आणि सहकारी संस्थांची कर्ज माफ करावे.
दुष्काळामुळे निर्माण झालेल्या बेरोजगारीचा प्रश्न सोडवला पाहिजे. शेतकऱ्यांना नरेगा अंतर्गत विविध कामे देऊन आर्थिक भार कमी करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. इरप्पा कत्ती, शशिकला देसाई, पर्वतम्मा कळसन्नावर यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी या आंदोलनात भाग घेतला.


Recent Comments