Belagavi

बेल्लद विधी महाविद्यालयात अभिरूप विधानसभा स्पर्धा

Share

बेळगाव विभागीय स्तरावरील मॉक असेंब्ली स्पर्धा सोमवारी बेळगाव येथील बी. व्ही. बेल्लद विधी महाविद्यालयात पार पडली. या अभिरूप विधानसभेत विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, पाण्याची समस्या असे अनेक ज्वलंत विषय हाताळले.

कर्नाटक कायदा आणि संसदीय सुधारणा संस्था, बेंगळूर आणि बी. व्ही. बेल्लद विधी महाविद्यालय, बेळगाव यांच्यावतीने बेळगाव विभागीय स्तरावरील मॉक असेंब्ली (अभिरूप विधानसभा) स्पर्धा- 2023-24 आज, सोमवारी शहरातील लिंगराज कॉलेज सेंट्रल ऑडिटोरियम येथे आयोजित करण्यात आली होती.

उद्घाटन समारंभात कर्नाटक कायदा आणि संसदीय सुधारणा संस्थेचे संचालक के. द्वारकानाथ बाबू प्रमुख पाहुणे होते तर याच संस्थेचे संशोधन संचालक डॉ. सी. एस. पाटील, अतिथी म्हणून उपस्थित होते. बी. व्ही. बेल्लद विधी महाविद्यालयाचे अध्यक्ष आर.बी. बेल्लद अध्यक्षस्थानी होते.
कन्नड शाळा, शेतकऱ्यांचे प्रश्न, आरक्षण, पाणी समस्या आदी मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये खडाजंगी झाली. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये अनेक मुद्द्यांवरून झालेल्या जोरदार चर्चेने अस्सल प्रातिनिधिक चर्चेला उधाण आले होते. एकूणच, निरोगी चर्चेतून विद्यार्थी भविष्यात लोकप्रतिनिधी बनू शकतात असा संदेश दिला गेला.

कर्नाटक कायदा आणि संसदीय सुधारणा संस्थेचे संचालक के. द्वारकानाथबाबू यांचे समारोपीय भाषण झाले. यावेळी कर्नाटक इन्स्टिट्यूट ऑफ लॉ अँड पार्लमेंटरी रिफॉर्म्सचे संशोधन प्रमुख डॉ. रेवय्या वोडेयार, बी. व्ही. बेल्लद विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंह आदी उपस्थित होते.

Tags: