Belagavi

सावरकर पुण्यतिथीला विरोध; हिंडलगा तुरुंग अधीक्षकांचा निषेध

Share

बेळगावातील हिंडलगा मध्यवर्ती तुरुंगाच्या आवारात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथी साजरी करण्यास तुरुंग अधीक्षकांनी परवानगी नाकारल्याने श्रीराम सेनेसह हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी त्यांचा निषेध करून रस्त्यावर फोटो ठेवून पूजा करून सावरकरांना अभिवादन केले.

स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांची आज पुण्यतिथी असल्याने श्रीराम सेनेसह हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते नेहमीप्रमाणे हिंडलगा तुरुंग आवारात गेले होते. त्यावेळी तुरुंग अधीक्षकांनी, आता सरकार बदलले आहे, तुम्हाला तुरुंग परिसरात सावरकरांना अभिवादनाचा कार्यक्रम करता येणार नाही असे सांगून परवानगी नाकारली. त्यामुळे कार्यकर्त्यांनी त्यांचा निषेध करून तुरुंगाबाहेर रस्त्यावर सावरकरांची प्रतिमा ठेवून पूजन करून नमन केले.

दरम्यान, कार्यकर्त्यांनी सावरकरांना अभिवादन केल्यावर त्यांच्या प्रतिमेसमोरच रस्त्यावर ठाण मांडून घोषणा देत तुरुंग अधीक्षकांचा निषेध केला. सावरकरांचा अवमान करणाऱ्या तुरुंग अधीक्षकांचा धिक्कार असो, सावरकरांचा अवमान करणाऱ्या सिद्दरामय्या सरकारचा धिक्कार असो, भारत माता की जय, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराज की जय आदी घोषणा त्यांनी दिल्या.

यावेळी इन न्यूजशी बोलताना श्रीराम सेना व हिंदुराष्ट्र सेनेचे प्रमुख रवी कोकितकर यांनी सांगितले की, दरवर्षी आम्ही हिंडलगा तुरुंगात ब्रिटिशांनी सावरकरांना ज्या कोठडीत डांबले होते, तेथे जाऊन सावरकरांची जयंती व पुण्यतिथी साजरी करत होतो. कालांतराने तुरूंगासमोर ती करू लागलो. पण यावेळी तुरुंग अधीक्षकांनी आता राज्यात सरकार बदलले आहे, तुम्हला तुरुंग परिसरात कुठेही सावरकर जयंती-पुण्यतिथी साजरी करता येणार नाही असे सांगून परवानगी नाकारली. हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा, संपूर्ण देश अवमान आहे. त्यांच्या या कृतीचा आम्ही तीव्र निषेध करतो.

भारतीय जनता पक्ष ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळण्यात सावरकरांचे मोठे योगदान आहे. पण राज्यात सिद्दरामय्या सरकार आल्यापासून मुस्लिम तुष्टीकरणाचे आणि राष्ट्रपुरुषांच्या अवमान, हिंदूंना पायदळी तुडवण्याचे काम सुरु आहे. त्यामुळेच सरकारच्या निर्देशावरून तुरुंग अधीक्षकांनी सावरकर पुण्यतिथीचा कार्यक्रम तुरुंगाच्या आवारात घेण्यास मनाई केली आहे. हा संपूर्ण देशाचा अवमान आहे. याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो.

यावेळी श्रीराम सेना व हिंदुराष्ट्र सेना, भारतीय जनता पक्ष आणि विविध हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: