Banglore

जातीव्यवस्था संपवण्यासाठी संविधानच हत्यार : मुख्यमंत्री सिद्धरामय्या

Share

शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विषमता निर्माण करणारी जातिव्यवस्था नष्ट करण्याचे हत्यार संविधान हेच आहे. समानता प्रस्थापित करणे ही सरकारची जबाबदारी आणि कर्तव्य आहे, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले.

संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त शनिवारी बेंगळुरातील राजवाडा मैदानावर आयोजित संविधान आणि एकता परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्याच प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी तुमकूर, दावणगेरे, म्हैसूर, कोडगू, बेळ्ळारी या जिल्ह्यांना संविधान जागृती जथ्याचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल बक्षीस आणि स्मृतिचिन्हांचे वितरण केले.

त्यानंतर बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, संविधानाच्या विरोधात दोन प्रकारचे अपप्रचार सुरू आहेत. राज्यघटना दलितांच्या उत्थानासाठी आहे आणि ती सामाजिक-आर्थिक परिस्थितीला अनुसरून नाही, असा अपप्रचार केला जात आहे. घटनेत स्वातंत्र्य, समता आणि बंधुता स्पष्टपणे सांगूनही काही लोक अपप्रचार करत आहेत, हे लक्षात घ्यायला हवे, असा सल्लाही त्यांनी दिला.

संविधान हे समता, मानवी समाज घडवण्याच्या बाजूने असणाऱ्यांच्या हातात असेल तर ते यशस्वी होईल. संविधानाच्या विरोधात असलेल्यांच्या हातात असेल तर आपला तरणोपाय नाही. संविधानाच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी राज्यघटनेच्या बाजूने असलेल्यांच्या हातात सत्ता असली पाहिजे, असे सिद्धरामय्या म्हणाले.

यावेळी विधान परिषदेचे सभापती बसवराज होरट्टी, समाज कल्याण मंत्री डॉ. एच. सी. महादेवप्पा, सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती गोपालगौडा, उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती नागमोहन दास, मंत्री प्रियांक खर्गे, आमदार सोमशेखर, अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. शालिनी रजनीश आदी उपस्थित होते.

Tags: