Belagavi

बेंगळुरातील संविधान जागृती एकता मेळाव्याचे थेट प्रक्षेपण

Share

बेंगळुरातील संविधान जागृती एकता मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर बेळगावात समाज कल्याण खात्याच्या वतीने आज विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बेंगळुरातील संविधान जागृती एकता मेळाव्याचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले.

भारतीय राज्य अमलात येऊन यंदा ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गेल्या २६ जानेवारीला राज्यभरात संविधान जागृती जथ्याचे आयोजन केले होते. सुमारे महिनाभर राज्यातील सर्व जिल्हे, तालुके आणि ग्राम पंचायत हद्दीत फिरून जथ्याचे आज बेंगळूर येथे आगमन झाले. त्या पार्श्वभूमीवर बेंगळुरातील राजवाडा मैदानावर सरकारने एकता मेळाव्याचे आयोजन केले. त्या पार्श्वभूमीवर बेळगावातही समाजकल्याण खात्याच्या वतीने इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअर्सच्या सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात बेंगळूर येथील मेळाव्याच्या उदघाटन समारंभाचे थेट प्रक्षेपण एलईडी स्क्रीनवर दाखविण्याची सोय करण्यात आली होती.

कार्यक्रमात प्रारंभी घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माजी मुख्यमंत्री देवराज अरस आदी मान्यवरांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. विविध दलित संघटनांचे कार्यकर्ते, समाजकल्याण खात्याच्या वसतिगृहातील विध्यार्थी-विद्यार्थिनी, खात्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रक्षेपण पाहून भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेचा वाचन करून राज्यघटनेशी एकनिष्ठ राहण्याची सामूहिक शपथ घेतली.

यासंदर्भात इन न्यूजला माहिती देताना बेळगाव तालुका समाजकल्याण अधिकारी महांतेश चिवटगुंडी म्हणाले की, राज्य सरकारने राज्यघटनेच्या अंलबजावणीला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर, घटनेने दिलेले मूलभूत अधिकार, नागरिकांची कर्तव्ये आणि जबाबदारी आदींबाबत जनजागृती करण्यासाठी गेल्या २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनापासून महिन्याभरासाठी जनजागृती जथ्याचे आयोजन केले होते. राज्यातील सर्व जिल्ह्यांत जथा काढण्यात आला. त्याचप्रमाणे बेळगाव जिल्ह्यातील सर्व १४ तालुक्यांमध्ये ५७ ग्राम पंचायतींमध्ये हा जथा काढून संविधानाविषयी जागृती करण्यात आली. हा जथा बेंगळूरमध्ये पोहोचल्याच्या पार्श्वभूमीवर बेंगळूरमधील राजवाडा मैदानावर आज राज्य सरकारने एकता मेळाव्याचे आयोजन केले.

त्याला उपस्थित राहण्यासाठी समाजकल्याण खात्यातर्फ बेळगावातून वाहनांची सोय करण्यात आली आहे. पण ज्यांना तेथे जाणे शक्य नाही अशा नागरिकांसाठी बेळगावात आज इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअर्सच्या सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात बेंगळूर येथील मेळाव्याच्या उदघाटन समारंभाचे थेट प्रक्षेपण एलईडी स्क्रीनवर दाखविण्याची सोय केली होती. विविध दलित संघटनांचे कार्यकर्ते, समाजकल्याण खात्याच्या वसतिगृहातील विध्यार्थी-विद्यार्थिनी, खात्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून थेट प्रक्षेपण पाहण्यासोबतच संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन करून शपथ घेतली.

दलित नेते मल्लेश कुरंगी म्हणाले की, संविधान जागृती जथ्याच्या सांगता समारंभानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात विविध दलित संघटनांचे नेते, समाजकल्याण खात्याचे अधिकारी व खात्याच्या वसतिगृहातील विध्यार्थ्यानी उपस्थित राहून बेंगळूरमधील एकता मेळाव्याचे प्रक्षेपण पाहून घटनेशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली आहे.

मादिग आरक्षण संघर्ष समितीचे बेळगाव जिल्हाध्यक्ष बसवराज अरवळ्ळी यांनी सांगितले की, राज्य सरकारने भारतीय घटनेला ७ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर काढलेल्या जागृती जथ्याची आज सांगता होत आहे. हा जथा यशस्वी होऊन सरकारचा उद्देश सफल झाला आहे.
दरम्यान, या कार्यक्रमास विविध दलित संघटनांचे पदाधिकारी व सदस्य, समाजकल्याण खात्याचे अधिकारी व कर्मचारी तसेच खात्याच्या निवासी शाळा व वसतिगृहातील विध्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: