Belagavi

बेळगावात दिव्यांग कर्मचाऱ्यांचे आंदोलन

Share

सरकारने दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण न केल्यास आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकू, असा इशारा अपंग कर्मचाऱ्यांनी दिला. बेळगावात 15 वर्षांपासून कार्यरत असलेल्या दिव्यांग कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळावे व त्यांची पदे कायम करावीत, या मागणीसाठी न्यू कर्नाटक अपंग मानद निधी कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनाबाबत प्रसारमाध्यमांना माहिती देताना फकीरगौडा पाटील म्हणाले की, दिव्यांग कर्मचारी 2008 पासून अत्यल्प मानधनावर सेवा देत आहेत. राज्य व केंद्र सरकारच्या सर्व योजना राज्यातील लोकांच्या दारापर्यंत पोहोचविण्याचे काम करत आहेत. त्यामुळे संबंधित मंत्री व अधिकाऱ्यांनी तातडीने आमच्या मदतीला धावून आमच्या न्याय्य मागण्या पूर्ण कराव्यात, अन्यथा आम्ही या निर्णयापासून मागे हटणार नसून २६ फेब्रुवारीला फ्रीडम पार्क, बंगळुरू येथे सत्याग्रह करू, असा इशारा दिला.

अनिल हिरकुडी यांनी सांगितले की, ग्रामपंचायतींमध्ये राज्य व केंद्र सरकारच्या योजनांचा ग्रामीण भागात प्रचार-प्रसार करण्याचे महत्वाचे काम दिव्यांग कर्मचारी करत आहेत. लोकांना योजनांची माहिती देणे, त्यांचे अर्ज भरून देणे यासह पडेल ती कामे अत्यल्प मानधनावर करत आहेत. त्यांना वेतन वाढवून सेवासुरक्षा देण्याची आमची प्रमुख मागणी आहे. आमच्या सर्व मागण्या अधिवेशनात मांडून त्या पूर्ण करण्याचे आश्वासन मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिले होते. मात्र या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही त्याची पूर्तता केलेली नाही.

यावेळी न्यू कर्नाटक फाऊंडेशन फॉर दि डिसेबल्डचे कार्यकर्ते आणि दिव्यांग ग्रापं कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते.

Tags: