Belagavi

शिवाजीनगरात श्री होळी कामण्णा मंदिराचे उदघाटन

Share

बेळगावातील शिवाजीनगर पाचवी गल्ली येथील श्री होळी कामण्णा मंदिराचा वास्तुशांत, मूर्ती प्रतिष्ठापना व कळसारोहण सोहळा आज भक्तिभावाने पार पडला. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.

बेळगावातील शिवाजीनगर पाचवी गल्ली येथील प्राचीन श्री होळी कामण्णा मंदिराचा वास्तुशांत, मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा आज श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक गुरुवर्य संभाजीराव भिडे यांच्या उपस्थितीत भक्तिभावाने पार पडला. यानिमित्त मूर्ती प्रतिष्ठापना, कळसारोहण आदी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

शिवाजीनगर परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुरातन श्री होळी कामण्णा मंदिराच्या वास्तुशांती, कळसारोहण सोहळ्याचे औचित्य साधून आज दुपारी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात भाविकांना पुरणपोळीचा प्रसाद देण्यात आला. यासाठी प्रभाग क्र. १४ चे नगरसेवक शिवाजीराव पुंडलिकराव मंडोळकर व कुटूंबियांनी तसेच परिसरातील दानशूर व स्थानिकांनी पुढाकार घेतला.

यासंदर्भात इन न्यूजला माहिती देताना नगरसेवक शिवाजीराव मंडोळकर म्हणाले की, शिवाजीनगर भागातील होळी कामण्णा मंदिर अतिशय पुरातन असून जागृत दैवत आहे. सुमारे ७५-८० वर्षांपासून या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याची भाविकांनी इच्छा होती. या ना त्या कारणाने हे काम रखडले होते. पण आज आमचे स्वप्न पूर्ण झाले आहे. मंदिर उदघाटनानिमित्त सोमवार दि. १९ रोजी सकाळी मंदिर वास्तू कार्यक्रम व दुपारी महिलांची कुंभ मिरवणूक काढण्यात आली. आज बुधवारी सकाळी मूर्ती प्रतिष्ठापना व कळसारोहण सोहळा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक गुरुवर्य संभाजीराव भिडे यांच्या उपस्थितीत भक्तिभावाने पार पडला. दुपारी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
आणखी एका भक्ताने सांगितले की, आज होळी कामण्णा देवाला पुरणपोळीचा नैवैद्य अर्पण करून सुमारे १५ ते २० हजार भाविकांना पुरेल असा पुरणपोळीचा महाप्रसाद वाटप करण्यात आला.

शिवाजीनगरातील ज्येष्ठ महादेव पवार यांनी मंदिराचा इतिहास सांगून हे मंदिर सुमारे ७५ वर्षे जुने व येथील भाविकांचे जागृत देवस्थान असल्याचे सांगितले. देवस्थानच्या रक्षणासाठी व जीर्णोद्धारासाठी मंडोळकर कुटुंबाने मोठी मेहनत घेतली आहे. नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांचे वडील पुंडलिकराव हे ज्येष्ठ पंच असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो. मंदिराच्या व्यवस्थापनासाठी पाच जणांचा ट्रस्ट नेमला आहे. आज मंदिराचे उदघाटन झाल्याने आम्ही धन्य झालो आहोत असे त्यांनी सांगितले.

यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक गुरुवर्य संभाजीराव भिडे यांनी मंदिरात जाऊन होळी कामण्णा देवाचे दर्शन घेऊन मंडोळकर कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांशी चर्चा केली.  यावेळी शिवाजीनगरच्या सर्व गल्ल्यांमधील रहिवासी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: