Belagavi

दुचाकीचे नियंत्रण सुटल्याने अपघातात एक ठार

Share

रात्रीच्या अंधारात वेगात असलेल्या दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याशेजारील खाजगी ले आऊटमधील गटारीत पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे.

श्याम नागाप्पा केदार वय 47, रा. वेंकटेश नगर मुतगा असे या घटनेत मरण पावलेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. या घटनेबाबत समजलेली हकीकत अशी की, शाम हे रविवारी रात्री बसरीकट्टी-मुतगा रस्त्यावरून बसरीकट्टीकडे दुचाकीवरून जात होते. अंधारात वेगात असलेल्या दुचाकीवरील नियंत्रण चुकल्याने जोरात दुचाकी रस्त्याशेजारील असलेल्या लेआउटच्या गटारीत पडली. त्यामुळे शाम यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. दुचाकी गटारीत अडकून पडली. रात्री अकराच्या सुमारास हा अपघात घडला. मात्र त्यावेळी रस्त्यावर कुणीही नसल्याने ही दुर्घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे. घटनास्थळी मारीहाळ पीएसआय मंजुनाथ व पोलिसानी भेट देऊन पंचनामा केला आहे. मृत शाम यांच्या मागे पत्नी एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.

Tags: