Banglore

फुसका अर्थसंकल्प म्हणत भाजप-जेडीएसची विधानसौधसमोर संयुक्त निदर्शने

Share

सिद्धरामय्या यांच्या अर्थसंकल्पात काहीच दम नसल्याचा आरोप करत हा केवळ फुसका अर्थसंकल्प असल्याची टीका करत भाजप-जेडीएसने आज विधानसौधसमोर संयुक्त निदर्शने केली.

विक्रमी १५ वा अर्थसंकल्प सादर करताना सुरुवातीलाच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केंद्र सरकारला धारेवर धरले. कर परतावा वितरणात राज्यावर अन्याय करत असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. याला भाजप सदस्यांनी आक्षेप घेतला. खोटं बोलू नका अशी खरडपट्टी काढली. त्यानंतर भाजप-जेडीएस सदस्यांनी विधानसौधसमोरील केंगल हनुमंतय्या यांच्या पुतळ्याजवळ संयुक्तपणे निदर्शने केली. सिद्धरामय्या यांच्या अर्थसंकल्पात काहीही दम नसल्याची टीका त्यांनी केली.

विधानसभेच्या प्रवेशद्वारावर विरोधी पक्ष भाजप-जेडीएसने आंदोलन केले. सिद्धरामय्या यांच्या बजेटमध्ये काहीच दम नाही, केवळ आश्वासनांचे हे बजेट आहे अशा घोषणा दिल्या. आंदोलनात विरोधी पक्षनेते आर. अशोक, भाजप प्रदेशाध्यक्ष बी.वाय. विजयेंद्र, माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांच्यासह भाजप आणि जेडीएसचे आमदार सहभागी झाले.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी, गरीब, तरुण आणि महिलांसाठी कोणतीही तरतूद अर्थसंकल्पात नसल्याची टीका केली. बंगळुरूसाठी काहीच नाही, गरिबांसाठी काहीच नाही, मध्यम वर्गासाठी काही नाही आणि तरुणांसाठीही काहीच नाही, असा संताप त्यांनी व्यक्त केला.

हा द्वेषाचा अर्थसंकल्प आहे. सिद्धरामय्या यांनी अर्थसंकल्पात डीके शिवकुमार यांच्याबद्दलचा द्वेष दाखवला आहे. डीके शिवकुमार यांच्यावरील द्वेषातून पाटबंधारे खात्याला तसेच बेंगळूरला काहीच अनुदान दिलेले नाही. हा खोटारडा अर्थसंकल्प असल्याची टीका बोम्मई यांनी केली.

Tags: