Khanapur

नंदगडमध्ये ‘गाव करेल ते राव काय करेल!’, रस्त्याची तरुणांकडून दुरुस्ती

Share

‘गाव करेल ते राव काय करेल’ या म्हणीचा प्रत्यय देणारी घटना खानापूर तालुक्यातील नंदगड येथे घडली आहे. खड्ड्यांमुळे खराब झालेल्या रस्त्याची दुरुस्ती करण्यात अधिकारी व लोकप्रतिनिधींना अपयश आल्याने तरुण व वृद्धांनी स्वखर्चाने रस्त्याची डागडुजी करून एक आदर्श घालून दिला आहे.

नंदगड गावातील अनेक छोट्या-मोठ्या समस्या सोडविण्यासाठी अनेकवेळा पंचायतीच्या निदर्शनास आणून देऊनही अध्यक्ष-उपाध्यक्षांकडून योग्य प्रतिसाद मिळत नाही. बस्ती गल्लीतील रस्त्याच्या बाबतीतही ग्रामस्थांना हाच अनुभव आला. त्यामुळे तरुण व ज्येष्ठांनी स्वखर्चाने रस्ता दुरुस्त केला. सिमेंट काँक्रेट घालून त्यांनी श्रमदानाने रस्त्याची डागडुजी केली. त्यामुळे त्यांचे सर्वांकडून कौतुक होत आहे.

यासंदर्भात इन न्यूजशी बोलताना माणिक्य कुरिया यांनी सांगितले की, नंदगड गाव हे ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले गाव आहे. राज्याच्या अनेक भागातून लोक येथील संगोळी रायण्णा यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेण्यासाठी येतात. बस्ती गल्लीतील खराब रस्त्याची समस्या वारंवार ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आणून दिली. येथील छोटय़ा-मोठय़ा समस्या सोडविण्यासाठी त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही, त्यामुळे आम्ही तरुणांसोबत मिळून या समस्या स्वत: सोडवत आहोत.

यावेळी वेदांत पारिशवाडकर, व्यंकटेश देगावकर, संतोष सुतार, संभाजी देगावकर, सागर कब्बूर, महांतेश राजपूत, शुभम पाटील आदी युवक उपस्थित होते.

Tags: