Belagavi

बेळगावच्या महापौरपदी सविता कांबळे, उपमहापौरपदी आनंद चव्हाण

Share

बेळगाव महानगरपालिकेच्या महापौरपदी सत्तारूढ भाजपच्या नगरसेविका सविता कांबळे यांची बिनविरोध तर उपमहापौरपदी भाजपचेच आनंद चव्हाण यांची ३९ मतांनी निवड झाली आहे. सविता कांबळे यांच्या रूपाने देशातच प्रथम एका पौरकार्मिक महिलेला महापौरपद मिळाले आहे.

बेळगाव महापालिकेच्या सभागृहात आज गुरुवारी सकाळी ९ वाजता महापौर-उपमहापौर पदासाठीच्या निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाला. सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत दोन्ही पदांसाठी अर्ज भरून घेण्यात आले. सत्तारूढ भाजपतर्फे महापौर पदासाठी वार्ड क्र. १७च्या नगरसेविका सविता कांबळे व वार्ड क्र. ३५ च्या नगरसेविका लक्ष्मी राठोड यांनी अर्ज सादर केले. अर्ज माघारीच्या मुदतीत लक्ष्मी राठोड यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे निवडणूक अधिकारी बेळगावचे प्रादेशिक आयुक्त संजय शेट्टनवर यांनी महापौरपदी सविता कांबळे बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.

उपमहापौर पदासाठी भाजपचे वार्ड क्र. ४५ चे नगरसेवक आनंद चव्हाण व वार्ड क्र. ५४च्या नगरसेविका माधवी राघोचे यांनी तर विरोधी गटातून पठाण आणि ज्योती कडोलकर अर्ज सादर केले. माघारीच्या मुदतीत राघोचे आणि पठाण यांनी अर्ज मागे घेतले. उपमहापौर पदासाठी दोन उमेदवार रिंगणात उरल्याने निवडणूक अधिकारी बेळगावचे प्रादेशिक आयुक्त संजय शेट्टनवर यांनी हात उंचावून मतदान घेतले. त्यात आनंद चव्हाण ३८ मतांनी उपमहापौरपदी निवडून आले. काँग्रेसच्या ज्योती कडोलकर यांना २० मते मिळाली.

महापौरपदी निवड केल्याबद्दल नूतन महापौर सविता कांबळे यांनी भारतीय जनता पक्षाचे व नेत्यांचे तसेच नगरसेवकांचे आभार मानले. पक्षामुळे व जनतेमुळे मला एवढ्या मोठ्या पदावर बसण्याचा मान मिळाला आहे. एक वर्षाच्या कार्यकाळात माझ्या हातून शक्य होतील तितकी विकासकामे करून मी शहराचा विकास करेन अशी ग्वाही त्यांनी दिली.

भाजपतर्फे माजी मंत्री मुर्गेश निराणी यांना बेळगाव महापौर-उपमहापौर निवडणुकीसाठी पक्षनिरीक्षक म्हणून नेमण्यात आले होते. निवडीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, सर्व नगरसेवकांच्या संमतीनुसार दोन्ही उमेदवार निवडून पक्षश्रेष्ठींची मंजुरी घेऊन उमेदवार निश्चित केले. महापौर-उपमहापौरपदी अनुक्रमे सविता कांबळे आणि आनंद चव्हाण यांना संधी देऊन भाजपने एका दलित-मागास व अल्पसंख्यांक समाजाला न्याय दिला आहे. याचा लोकसभा निवडणुकीत भाजपला फायदा मिळेल. यातून मोदींना तिसऱ्यावेळी पंतप्रधान होण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी आज आशीर्वाद दिला आहे.

आमदार अभय पाटील म्हणाले की, मनपा सत्तारूढ भाजपात कसलेच मतभेद नाहीत. सर्वानुमते दोन्ही उमेदवार ठरवण्यात आले आहेत. ज्यांना संधी मिळाली नाही त्यांना पुढीलवेळी मिळेल. कोअर कमिटीत चर्चा करून पक्षश्रेष्ठींच्या मंजुरीनेच महापौर व उपमहापौर निवडले आहेत.
भाजप राज्य प्रवक्ते ऍड. एम. बी. जिरली म्हणाले की, आज बेळगावच्या महापौरपदी एक दलित महिला निवडून आली याचे श्रेय घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जाते. निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी परिश्रम घेतलेल्या अधिकाऱ्यांचे आणि प्रसारमाध्यमांचे मी पक्षातर्फे आभार मानतो, असे ते म्हणाले.

दरम्यान, सविता कांबळे यांच्या महापौरपदी निवडीने संपूर्ण देशातच सर्वप्रथम एका पौरकार्मिक महिलेला शहराचा प्रथम नागरिक होण्याचा मान मिळाला आहे. त्यामुळे बेळगावचा नावलौकिक देशात वाढला आहे. अत्यंत गरीब परिस्थितीतून वर आलेल्या सविता कांबळे यांचे रायबाग तालुक्यातील शिरगुर हे मूळ गाव. बेळगावच्या सरदार्स हायस्कूलमधून त्यांनी एसएसएलसी पर्यंतचे शिक्षण घेतले. सदाशिव नगरातील बेलदार छावणीत राहणाऱ्या सविता कांबळे आधी दुसऱ्यांच्या घरी धुणी-भांडी करायच्या, नंतर त्यांनी उद्यमबाग येथील अगरबत्ती कारखान्यात व नंतर व्हेगा हेल्मेट कारखान्यात नोकरी केली. याच दरम्यान त्यांनी ३-४ महिने बेळगाव महापालिकेत कंत्राटी तत्वावर पौरकार्मिक म्हणूनही काम केले आहे.

दरम्यान, सत्तारूढ भाजपमध्ये कन्नड व मराठी अशा दोन्ही भाषिक नगरसेवकांचा समावेश आहे. गेल्यावेळी महापौर-उपमहापौर ही दोन्ही पदे मराठी भाषिकांना मिळाली होती. मात्र यंदा कन्नड भाषिक नगरसेविकेला महापौर व मराठी भाषिक नगरसेवकाला उपमहापौर करून समतोल राखण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने कोणालाही न दुखावण्याची रणनीती राबविल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Tags: