Belagavi

राजशेखर पाटील यांच्यासह 9 जणांना वेदांत फौंडेशनचे नवरत्न पुरस्कार

Share

बेळगावातील वेदांत फौंडेशनच्या वतीने देण्यात येणाऱ्या वेदांत एक्सलन्स अवार्डची घोषणा करण्यात आली असून, इन न्यूजचे मुख्य संपादक राजशेखर पाटील यांच्यासह 9 जणांची या पुरस्कारांसाठी निवड झाली आहे.   वेदांत फौंडेशनच्या पुरस्कारांचे वितरण शनिवार दि. 17 रोजी सकाळी 11.30 वाजता महिला विद्यालय इंग्रजी माध्यम शाळेत करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्व भारत सेवा समितीचे अध्यक्ष विजय नंदिहळ्ळी राहणार आहेत.

कार्यक्रमाचे उद्घाटन समृद्धी संस्थेचे सेक्रेटरी वीरेश किवडसण्णावर, शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयकुमार हेबळ्ळी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. मार्कडेय साखर कारखान्याचे संचालक अविनाश पोतदार मार्गदर्शन करणार असून प्रमुख पाहुणे म्हणून रमेश आनंदाचे, बेळगाव शहर गटशिक्षणाधिकारी लिलावती हिरेमठ, शिक्षक संघटनेचे शहर अध्यक्ष बाबू सोगलण्णावर, आय. डी. हिरेमठ, प्राचार्या कविता परमानीक आदी उपस्थित राहणार आहेत.

यावेळी वेदांत फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणार्या नवरत्न पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. शिक्षक, पोलिस आणि पत्रकार यांचा यामध्ये समावेश आहे.

पुरस्कारप्राप्त शिक्षकांमध्ये सी. वाय. पाटील (ठळकवाडी हायस्कूल टिळकवाडी), बेबीअस्मा नाईक (सरकारी प्राथमिक शाळा शाहूनगर), अनुराधा तारिहाळकर (सरकारी प्राथमिक शाळा बसुर्ते), सुजाता लोखंडे (सरकारी प्राथमिक शाळा क्रमांक 24), पत्रकारामध्ये राजशेखर पाटील (इन न्यूज वाहिनी, बेळगाव), शिवाजी शिंदे, (दै. पुढारी), सुनिल पाटील (द न्यू इंडियन एक्सप्रेस), पोलिस केंपाण्णा दोडमनी ( एपीएमसी पोलिस स्थानक), कशिनाथ इरगार (उत्तर विभाग रहदारी पोलिस स्थानक) यांचा समावेश आहे.

पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र, शाल, हार व रोख रक्कम असे असणार असल्याची माहिती फौंडेशनचे अध्यक्ष सतीश पाटील, उपाध्यक्ष एन. डी. मादार, सचिव ईश्वर पाटील यांनी दिली आहे.

Tags: