Belagavi

संजय पाटील यांना लोकसभेचे तिकीट देण्याची मराठा समाजाची मागणी

Share

बेळगाव ग्रामीणचे माजी आमदार संजय पाटील हे सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारे नेते असल्याने त्यांनाच यावेळच्या लोकसभा निवडणुकीची उमेदवारी द्यावी अशी मागणी ग्रामीणमधील मराठा समाजाने केली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील मराठा समाजाची बैठक आज कॅम्पमधील गंगाधर शानभाग हॉलमध्ये पार पडली. या बैठकीत माजी आमदार संजय पाटील यांनाच यावेळच्या लोकसभा निवडणुकीसाठी बेळगाव मतदार संघातून उमेदवारी द्यावी अशी मागणी करण्यात आली. तशा अर्थाचा ठराव मंजूर करण्यात आला. यासंदर्भात भाजपच्या जिल्हा, राज्य आणि देश पातळीवरच्या नेत्यांना, प्रदेशाध्यक्षांना भेटून निवेदन देण्याचाही निर्णय घेण्यात आला.

यासंदर्भात इन न्यूजशी बोलताना ग्रामीणमधील मराठा समाजाचे संयोजक विनय कदम म्हणाले की, माजी आमदार संजय पाटील यांना लोकसभेचे तिकीट द्यावे या मागणीसाठी आज आम्ही ग्रामीण मतदारसंघातील मराठा समाजाची आणि युवकांची बैठक घेतली आहे. विद्यमान खासदार मंगल अंगडी यांना भाजप नेतृत्व तिकीट देणार नसले तर ते संजय पाटील यांना द्यावे अशी आमची मागणी आहे. कारण हे सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारे नेते आहेत. बेळगाव लोकसभा मतदार संघात मराठा समाजाचे ५. ५० लाख मतदार आहेत. त्यांनी आमच्या समाजाच्या अनेक समस्या सोडवल्या आहेत. त्यामुळे त्यांना तिकीट दिल्यास आम्ही त्यांना बहुमताने निवडून आणू. त्यांना लोकसभेची उमेद्वारी द्यावी या मागणीसाठी आम्ही पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांना भेटून निवेदन देणार आहोत.

आजच्या बैठकीला अनेक माजी तालुका, जिल्हा पंचायत सदस्य, ग्रामपंचायत अध्यक्ष-उपाध्यक्ष व सदस्य, मराठा समाजाचे नेते, कार्यकर्ते उपस्थित आहेत असे त्यांनी सांगितले. बेळगाव तालुका वारकरी सेवा संघाचे परशराम तुप्पट यांनी सांगितले की, आम्ही भाजपात अनेक वर्षे विविध पदांवर असलो तरी मराठा समाजाचे खास असे नेतृत्व नाही. संजय पाटील यांनी आमदार असताना व नसतानाही आमच्या समाजाचे प्रश्न सोडवले आहेत. सर्व समाजांना आणि सर्व भाषिकांना ते सोबत घेऊन जाणारे नेतृत्व आहे. त्यामुळे भाजपने यावेळच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनाच उमेदवारी द्यावी अशी आमची मागणी आहे.

बेळगाव ग्रामीण महिला मोर्चाच्या माजी अध्यक्षा ज्योती कुलकर्णी म्हणाल्या की, संजय पाटील हे मराठी व कन्नड भाषिक, हिंदुत्ववाद्यांना सोबत घेऊन जाणारे, लोकाभिमुख नेतृत्व आहेत. त्यामुळे त्यांनाच यावेळी लोकसभेची उमेदवारी द्यावी अशी आमची मागणी आहे.
यावेळी लोकसभा ग्रामीण मंडळ संचालक युवराज जाधव, बेळगाव जिल्हा प्रकोष्ठ संचालक दिनेश पाटील, यल्लाप्पा कळभट, कुद्रेमनी ग्रापं अध्यक्ष संजय पाटील, बेनकनहळ्ळी ग्रापं अध्यक्ष यल्लाप्पा पाटील, निलजी ग्रापं अध्यक्ष हेमंत पाटील, महेश रेडेकर, स्नेहलता कोळेकर, अर्चना पाटील, रंजनाताई कोलकार, भाजप जिल्हा युवामोर्चा सरचिटणीस चेतन पाटील, उमा देसाई, हनुमंत पाटील, राजू पोटे आदी मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: