बेळगाव पालिकेच्या महापौर-उपमहापौर पदासाठी उद्या होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगावात आज भाजप महानगर जिल्हा कार्यकारिणी आणि नगरसेवकांची बैठक घेण्यात आली.
अपेक्षित संख्याबळ आणि आरक्षणानुसार पात्र उमेदवारही असल्याने बेळगाव महापालिकेतील सत्तारूढ भारतीय जनता पक्षात आत्मविश्वासाचे वातावरण आहे. तरीही प्रथेप्रमाणे आज भाजप महानगर जिल्हा शाखेच्या कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली. भाजप राज्य उपाध्यक्ष माजी आमदार अनिल बेनके आणि बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी बैठकीला मार्गदर्शन करून नगरसेवकांच्या सूचना व सल्ले ऐकून घेतले.
बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अनिल बेनके म्हणाले की, महापौर-उपमहापौर पदासाठी उद्या निवडणूक होत असल्याने त्या पार्श्वभूमीवर आज बेळगावात पक्ष कार्यकारिणीची आणि नगरसेवकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत नगरसेवकांनी विविध मते मांडली. महापौर पदासाठी एससी महिला आरक्षण जाहीर झाले आहे. आमच्याकडे या पदासाठी सविता कांबळे आणि लक्ष्मी राठोड अशा दोन उमेदवार आहेत. त्यांच्या नावांवर उद्या सकाळी होणाऱ्या कार्यकारिणीत चर्चा करून अंतिम उमेदवार निश्चित करण्यात येईल. त्याचे नाव पक्षश्रेष्ठी आणि प्रदेशाध्यक्षांना पाठवून त्यांची अंतिम मंजुरी घेऊन उमेदवार फायनल करण्यात येईल. तो उमेदवार सभागृहात महापौरपदासाठी अर्ज भरेल.
कोणतेही मतभेद, नाराजी उदभवणार नाही याची काळजी घेण्यात येईल. पक्षशिस्तीचा भाग म्हणून आज सायंकाळी पाच वाजता व्हीप जारी करण्यात येईल. आमच्याकडे मूळचे भाजपचे ३५ आणि दोन अपक्ष असे एकूण ५८ पैकी ३७ चे संख्याबळ आहे. त्यामुळे कसलेच भय नाही. भाजपचाच महापौर आणि उपमहापौर होईल यात तिळमात्र शंका नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले .
यावेळी बोलताना आमदार अभय पाटील म्हणाले की, आजच्या कार्यकारिणी बैठकीत उद्याची महापौर आणि उपमहापौर निवडणूक तसेच आगामी लोकसभा निवडणुकीवर चर्चा करण्यात आली. यावेळी नगरसेवकांनी व कार्यकारिणी सदस्यांनी विविध मते मांडली. त्यांचा विचार करून उद्या सकाळी होणाऱ्या कार्यकारिणी बैठकीत महापौर आणि उपमहापौर पदासाठीचे उमेदवार निश्चित करण्यात येतील. प्रदेशाध्यक्षांना त्यांची नावे पाठवून मंजुरी घेऊन अंतिम उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येतील. महापौर पदासाठी आमच्याकडे दोन उमेदवार आहेत. मात्र कोणीही अर्ज केलेला नाही. पक्षशिस्तीनुसार ज्याचे नाव जाहीर केले जाईल तोच उमेदवार उद्या अर्ज भरेल. उपमहापौर पदासाठी सर्वच ३५ नगरसेवक पात्र आहेत. त्यापैकी कोणीही उपमहापौर होऊ शकेल असे सांगत त्यांनी महापौर-उपमहापौरपदाची नावे जाहीर करणे टाळले.
यावेळी महापौर शोभा सोमनाचे आणि उपमहापौर रेश्मा पाटील यांनी एक वर्षाच्या कार्यकाळात चांगले प्रशासन दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. मनपा सत्तारूढ गटनेते राजशेखर डोनी, चारही स्थायी समित्यांचे अध्यक्ष आणि भाजप सत्तारूढ नगरसेवक बैठकीला उपस्थित होते.


Recent Comments