Belagavi

न्यायालयीन कर्मचाऱ्यांची ‘ज्युडिशिअल सायक्लोथॉन’ उत्साहात

Share

फिटनेसचा संदेश देत बेळगावात आज न्यायालयीन कर्मचाऱ्यांची ‘ज्युडिशिअल सायक्लोथॉन’ उत्साहात पार पडली.

एरव्ही न्यायालयाच्या क्लिष्ट कामकाजात सदानकदा गुंतून राहणाऱ्या न्यायाधीश, वकील आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांसाठी शारीरिक तंदुरुस्ती राखणे आवश्यक आहे. या हेतूने बेळगावात आज शनिवारी सकाळी ७ वाजता ‘ज्युडिशिअल सायक्लोथॉन’चे आयोजन करण्यात आले होते. विविध न्यायालयांचे न्यायाधीश, वकील आणि न्यायालयीन कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांनी या सायक्लोथॉनमध्ये अत्यंत उत्साहाने भाग घेतला.

बेळगाव जिल्हा प्रथम मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. विजयालक्ष्मी देवी यांच्याहस्ते जुन्या कोर्टाच्या आवारात हिरवे निशाण दाखवून या सायकल फेरीला चालना देण्यात आली. त्यानंतर चन्नम्मा चौक, कॉलेज रोड, धर्मवीर संभाजी महाराज चौक, कॅम्प महिला पोलीस स्थानक, केंद्रीय विद्यालय, शौर्य चौक, गांधी चौक, जाधवनगर एनसीसी सर्कल, डीसी बंगला, सदाशिवनगर, रामदेव हॉटेल, आर. एन, शेट्टी पॉलिटेक्निक, हायवे सर्व्हिस रोड, किल्ला तलाव, आरटीओ सर्कलमार्गे फिरून जिल्हा न्यायालय आवारात ज्युडिशिअल सायक्लोथॉनच सांगता झाली.

ज्युडिशिअल सायक्लोथॉनमध्ये सहभागी झालेल्या मुलांनी हातात सामोपचाराने न्यायालयीन खटले निकालात काढण्याविषयी जनजागृती करणारे फलक हाती धरले होते. पुरुषांप्रमाणेच महिला आणि मुलांनी सायक्लोथॉनमध्ये लक्षणीय संख्येने सळसळत्या उत्साहाने भाग घेतला.

Tags: