आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) च्या वतीने आयोजित केल्या गेलेल्या २६व्या श्री हरे कृष्ण रथयात्रा महोत्सवास अभूतपूर्व जल्लोषात प्रारंभ झाला.
शनिवारी दुपारी दीड वाजता धर्मवीर संभाजी चौकातून सुरु झालेल्या या रथयात्रेला इस्कॉन चे ज्येष्ठ संन्याशी भक्ती रसामृत स्वामी महाराज आणि चैतन्य सुंदर महाराज, मॉरिशस व वृंदावनदास महाराज यांच्या हस्ते रथाची पूजा करून चालना देण्यात आली . याप्रसंगी बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील, रमाकांत कोंडूसकर, एम. एल. अगरवाल, अरुण कटांबळे, कनुभाई ठक्कर, राजु हत्तरगी यांच्यासह इस्कॉन चळवळीतील अनेक जेष्ठ सदस्य उपस्थित होते.

बेळगाव जिल्हा आणि देशाच्या विविध भागातून आलेले इस्कॉनचे हजारो स्त्री-पुरुष भक्त या रथयात्रेत सहभागी झाले होते या रथयात्रेच्या प्रारंभी बोलताना भक्तीरसामृत स्वामी महाराजांनी सर्वांचे स्वागत केले आणि ‘हरे कृष्ण रथयात्रा महोत्सव हा अनेक वर्षापासून जगभरात सुरु असलेला उत्सव असून तो इतर सर्वसामान्य उत्सवासारखा नाही. शाश्वत राहणाऱ्या या उत्सवात सहभागी झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. “५०० वर्षापूर्वी चैतन्य महाप्रभुंनी या रथयात्रेची सुरुवात केली. ती आता जगभरात आणि बेळगावात ही सुरु आहे अशी माहिती यावेळी वृंदावनदास महाराज यांनी दिली. आज व उद्या इस्कॉन मंदिराच्या पाठीमागे उभारण्यात आलेल्या मंडपात होणाऱ्या विविध सांस्कृतिक व आध्यात्मिक कार्यक्रमाला बेळगावकरांनी सहकुटुंब उपस्थित रहावे असे आवाहनही त्यांनी केले.
फूलानी सजविलेला रथ व रथामध्ये श्री हरे कृष्ण, राधामैया व गौर निताय यांचे ठेवलेले आर्च विग्रह सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. दुसऱ्या एका खास रथात इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्रील प्रभूपाद यांचा पुतळा ठेवलेला होता. रथाला जोडलेले दोरखंड ओढत भक्तगण हा रथ संभाजी चौकातून कॉलेज रोड, समादेवी गल्ली, खडेबाजार गणपत गल्ली, मारुती गल्ली, किर्लोस्कर रोड, रामलिंग खिंड गल्ली, पाटील गल्ली, रेल्वेओव्हर ब्रिजवरून कपिलेश्वर रोडमार्गे खडेबाजार शहापूर, आयुर्वेदिक कॉलेज रोड वरून गोवावेस मार्गे सायंकाळी ०६.३० वाजता टिळकवाडीतील इस्कॉन मंदिराकडे पोहोचला आणि तेथे रथयात्रेची सांगता झाली.

रथयात्रेच्या मार्गावर अनेक ठिकाणी रथयात्रेवर पुष्पवृष्टी केली गेली या रथयात्रेच्या अग्रभागी रंगोली काढणारी ५ पथके होती त्यापाठोपाठ शृंगारलेल्या सुमारे २० बैलजोड्या, भजन-कीर्तन मध्ये तल्लीन झालेले हजारो भक्त भगवान श्रीकृष्णाचा नामोच्चार करीत पुढे सरकत होते. भगवान श्रीकृष्णाच्या लीला सादर करणारे अनेक प्रसंग तसेच रामायणातील अनेक प्रसंग विविध गाड्यांवर सादर केले जात होते. ढोल वाजवणारे पथक व हंदीगनुरच्या ज्ञानेश्वर भजनी मंडळीचे भजन सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. आज देशाच्या विविध भागात रथयात्रा होत असली तरीही इस्कॉन मध्ये बेळगावच्या रथयात्रेला विशेष महत्त्व आहे. अभूतपूर्व उत्साह असलेली ही रथयात्रा म्हणजे जनतेला दर्शन देण्यासाठी साक्षात भगवंतच रस्त्यावर उतरलेले होते.


Recent Comments