Belagavi

शेट्टर यांचा केसपेपर वेगळा अन सवदी यांचा केसपेपर वेगळा : जारकीहोळी

Share

जगदीश शेट्टर यांचा केसपेपर वेगळा अन लक्ष्मण सवदी यांचा केसपेपर वेगळा आहे. आमदार लक्ष्मण सवदी हे आमच्या पक्षाच्या बाजूने आहेत. ते काँग्रेस सोडणार नाहीत, असा दावा बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केला.

जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, महानगरपालिका, ग्रामीण व नागरी स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील सरदार हायस्कूलच्या मैदानावर आज आयोजित हमी योजनांच्या लाभार्थ्यांच्या मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पाच हमी योजनांची माहिती जिल्हा केंद्रांवर आणि तालुक्याच्या आमदारांच्या स्तरावर जनतेला देण्यासाठी आम्ही कार्यक्रमाचे लाभार्थी मेळाव्यांचे आयोजन करत आहोत, असे ते म्हणाले.

आमदार लक्ष्मण सवदी काँग्रेस सोडणार नाहीत, भाजप फक्त त्यांच्या उरत येण्याची वाट पाहत आहे, जगदीश शेट्टर यांचे प्रकरण वेगळे आहे. सवदी यांचे प्रकरण वेगळे आहे. एका केसची दुसऱ्या केसशी तुलना होऊ शकत नाही. प्रत्येक केस वेगळी आहे. प्रत्येक डॉक्टरचे केसपेपर वेगवेगळे असतात, अशी गंमत त्यांनी केली.

लक्ष्मण सवदी यांना मंत्रीपदाची ऑफर देणार का, असे विचारले असता ते म्हणाले, अजूनही वेळ आहे. चांगल्या लोकांना संधी असते. त्यांच्यात क्षमताही आहे. यापूर्वीही त्यांनी चांगले काम केले आहे. मी नाही म्हणू शकत नाही, आगामी काळात त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. असे ते म्हणाले. राज्यातील झेंड्यांच्या मुद्द्यावर होणाऱ्या वादांबाबत भाष्य करताना सतीश जारकीहोळी म्हणाले की, राज्यात झेंड्यांवरून होणारा संघर्ष थांबला पाहिजे. समाजात विकास आणि समता असावी, असे ते म्हणाले.

बेळगाव लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची निवड करणे काँग्रेस हायकमांडवर अवलंबून आहे. डॉ. गिरीश सोनवलकर किंवा मृणाल हेब्बाळकर यांचे नाव पक्ष हायकमांडला फायनल करायचे आहे. या विषयावर मुख्यमंत्र्यांशी चर्चेची दुसरी फेरी व्हायला हवी, असे ते म्हणाले.  मी चिक्कोडी मतदारसंघातून निवडणूक लढवणार नाही, प्रत्येकवेळी लाथ खाण्यासाठी मी काही फुटबॉल नाही, या प्रकाश हुक्केरी यांच्या विधानावर बोलताना, प्रकाश हुक्केरी निवडणूक लढवणार नाही म्हणतात तेंव्हा निवडणूक लढवतात, निवडणूक लढवतो म्हणतात तेंव्हा लढवत नाहीत. आम्हाला तो डी-कोड माहित आहे. ते जे बोलतात त्याच्याउलट करतात. आम्ही दोन्ही मतदारसंघात विजय मिळवण्याचा प्रयत्न करू, असे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.

Tags: