बेळगावातील वडगाव येथील गाडेमार्गावर एका पतसंस्थेकडून झालेले अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी या भागातील शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर केले.
वडगाव येथील शेतकऱ्यांना शेत-शिवारात जाण्यासाठी म्हणून सुमारे ३०० वर्षांपासून ३३ फुटांचा रस्ता गाडेमार्ग म्हणून राखून ठेवण्यात आला आहे. या रस्त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात बैलगाड्या, ट्रॅक्टर व दुचाकीसह अन्य वाहने घेऊन जाणे, शेतातील पीक घरी आणणे सोपे होते. मात्र काही दिवसांपूर्वी या रस्त्यावर सुमारे १० ते १२ फुटापर्यंत अतिक्रमण झाले आहे. ते काढून पूर्वीच्याच मापाचा रस्ता शेतकऱ्यांना वाहतुकीसाठी खुला करून द्यावा, या मागणीसाठी वडगाव, शहापूर भागातील शेतकऱ्यांनी आज बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून आंदोलन छेडले.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना अमोल देसाई व अन्य एका शेतकऱ्याने सांगितले की, वडगावच्या सर्व्हे नं. २०९ मध्ये शहापूर गाडेमार्ग म्हणून ओळखला जाणारा ३३ फूट रुंदीचा रस्ता सुमारे ३०० वर्षांपासून शेतकऱ्यांना शेताकडे वहिवाटीसाठी राखीव ठेवला आहे. त्यात याच सर्व्हे नंबरमधील काही लोकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे हित धोक्यात आले आहे. म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी यात जातीने लक्ष घालून अतिक्रमणे हटवून आम्हाला रस्ता खुला करून द्यावा या मागणीसाठी आम्ही आज आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आलो आहोत.
माजी नगरसेवक मनोहर हलगेकर यांनी सांगितले की, गाडेमार्गाजवळ एका पतसंस्थेने प्लॉट पाडण्यासाठी जागा खरेदी केली होती. त्याचवेळी आम्ही त्या जागेतील अतिक्रमणासंदर्भात पतसंस्थेला सावध केले होते. पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करून जागा खरेदी करून भूखंड पाडले आहेत. यात गाडेमार्गावर अतिक्रमण झाले असून, शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी आमची मागणी आहे.
या निदर्शनानंतर शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर केले. आंदोलनात माधवपूर -वडगाव, शहापूर, खासबाग, जुने बेळगाव आदी भागातील शेतकरी सहभागी झाले होते.


Recent Comments