National

मोबाईल फोन स्वस्त होणार, बजेटपूर्वी केंद्र सरकारकडून मोठा दिलासा !

Share

बजेट 2024 च्या आधीच केंद्र सरकारने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. आता मोबाईल फोन स्वस्त होणार आहेत. अंतरिम अर्थसंकल्पाआधी केंद्र सरकारने मोठी घोषणा करत जनतेला मोठा दिलासा दिला आहे.

भारत सरकारने मोबाईल फोनच्या उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या प्रमुख घटकांवर आयात शुल्क कमी केलं आहे. उद्या 1 फेब्रुवारीला देशाचा अंतरिम अर्थसंकल्प 2024 जाहीर होणार आहे, त्याआधीच सरकारने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे.

मोबाईल फोनं घेणं होणार स्वस्त
मोबाईल फोनच्या उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंवरील आयात शुल्क 15 टक्क्यांवरून 10 टक्के करण्यात आले आहे. मोबाईल फोनसाठी लागणाऱ्या कच्च्या मालावरील आयात शुल्कात पाच टक्क्यांची घट करण्यात आली आहे. याचा परिणाम मोबाईल फोनच्या किमतीवरही पाहायला मिळणार असून, येत्या काळात मोबाईल फोन स्वस्त होण्याची शक्यता आहे.
महसूल विभागाकडून अधिकृत अधिसूचना जारी

अर्थमंत्रालयाकडून याबाबत अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. महसूल विभागाने 30 जानेवारी रोजी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे की, भारत सरकारच्या वित्त मंत्रालय अर्थात महसूल विभागाकडून क्रमांक 50/2017 सीमाशुल्क यांच्या अधिसूचनेमध्ये सुधारणा केल्या आहेत. यानुसार, मोबाईल तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पार्ट्सवर आता 15 टक्क्यांऐवजी 10 टक्के आयात शुल्क आकारण्यात येणार आहे. आयात शुल्कात घट झाल्यामुळे मोबाईल फोन स्वस्त होण्याची शक्यता आहे.
उद्या 1 फेब्रुवारीला म्हणजेच गुरुवारी देशाच्या नवीन संसदेत 2024 चा अर्थसंकल्प सादर केला जाईल. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन बुधवारपासून सुरू झाले आहे. अंतरिम अर्थसंकल्पाची तयारीही सरकारने पूर्ण केली आहे. अर्थसंकल्पापूर्वी होणारा हलवा समारंभही नुकताच पार पडला. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प असल्याने हा अर्थसंकल्प खास आहे. यानंतर नवीन सरकारने पदभार स्वीकारल्यानंतर पूर्ण अर्थसंकल्प सादर केला जाईल.

Tags: