माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केल्याने आमदार लक्ष्मण सवदी हेही भाजपमध्ये परतणार असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे. दरम्यान, लक्ष्मण सवदी हेही भाजप नेत्यांसोबत फिरताना दिसून आल्याने खळबळ उडाली आहे.

GFX
भाजपच्या माजी खासदार, आमदारांसोबत लक्ष्मण सवदी यांच्या फेऱ्या
अथणी साहुकारांच्या पवित्र्याबाबत लोकांत उत्सुकता
डीसीसी बँक सर्वसाधारण सभेसाठी एकत्र आल्याचे सवदींचे स्पष्टीकरण
माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर काँग्रेस सोडून भाजपमध्ये परतले आहेत. यानंतर लक्ष्मण सवदी हेही भाजपमध्ये परतणार असल्याची चर्चा सुरु आहे. दुसरीकडे लक्ष्मण सवदी यांनी भाजपमध्ये जाणार नसल्याचे सांगितले आहे. मात्र, लक्ष्मण सवदी हे भाजप नेत्यांसोबत फिरताना दिसून आल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
भाजपचे खासदार अण्णासाहेब जोल्ले आणि भाजपचे माजी आमदार महांतेश दोड्डगौडर हे लक्ष्मण सवदींच्या गाडीतून प्रवास करत आहेत. डीसीसी बँकेच्या सर्वसाधारण सभेलाही ते एकत्र आले. मात्र, बँकेच्या बैठकीला येण्यापूर्वी त्यांनी बेळगावातील सदाशिवनगर येथील सवदींच्या निवासस्थानी जेवणाच्या निमित्ताने गुप्त बैठक घेतली.
काँग्रेस सोडणार नाही, असे सांगणारे आमदार लक्ष्मण सवदी यांनी डीसीसी बँकेच्या सर्वसाधारण सभेच्या नावाखाली राजकीय चर्चा केलीका ? सवदी पुन्हा भाजपमध्ये जाणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाच सवदी भाजपच्या नेत्यांसोबत फिरत असल्याने कुतूहल निर्माण झाले आहे.
दरम्यान, यावर प्रतिक्रिया देताना, माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी म्हणाले, माझ्या मनात काय आहे हे कोणालाही कळू शकत नाही. हे फक्त मला आणि त्या परमेश्वरालाच माहीत आहे. बी.एल.संतोष यांच्यासह कोणीही संपर्क साधला नाही, हा प्रश्नच निर्माण झाला नाही. जेव्हा त्यांना माझी गरज असते तेव्हा ते स्वाभाविकपणे विचारतात. मीच निर्णय घेणार आहे, असा प्रतिवाद त्यांनी केला. दरम्यान, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेबाबत सवदी म्हणाले की, मुख्यमंत्री हे आमच्या घरचे धनी आहेत, त्यांच्याशी बोलणे चुकीचे आहे का? मी पक्ष सोडला तर ते काहीही बोलू शकतात. मतदारसंघातील सिंचन योजनेबाबत आपण नुकतीच डी.के.शिवकुमार यांची भेट घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
चिक्कोडीचे खासदार अण्णासाहेब जोल्ले म्हणाले की, लक्ष्मण सवदी भाजपमध्ये येऊ देत असे आम्ही म्हणतो, पण केंद्र व राज्याचे नेते काय निर्णय घेतात पाहूयात. बेळगावात पत्रकारांशी बोलताना जोल्ले म्हणाले की लक्ष्मण सवदी यांना भाजपात परत आणण्याची जबाबदारी सर्वांच्या खांद्यावर आहे. मी असो, इरण्णा कडाडी, महांतेश दोड्डगौडर, रमेश कत्ती या जिल्ह्यातील सर्व भाजप नेत्यांवर आहे, असे ते म्हणाले.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या उंबरठ्यावर अनेक बदल घडवून आणण्याचा दावा लक्ष्मण सवदी यांनी केला आहे. त्यामुळे राज्यात विशेषत: मध्य कर्नाटक आणि उत्तर कर्नाटकात भाजप आणि काँग्रेसमधील अनेक राजकीय गणिते आणि समीकरणे बदलण्याची अपेक्षा आहे.
Recent Comments