National

७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त गुगलने भारतीयांना दिल्या शुभेच्छा

Share

देशभरात ७५ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. त्यानिमित्त राजधानी नवी दिल्लीसह देशभरात अनेक ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. दरम्यान, सर्च इंजिन गूगलने भारताच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीयांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. गूगलने यानिमित्ताने एक अनोखे डूडल शेअर केले आहे; ज्यात प्रजासत्तक दिनाच्या परेडची झलक दिसत आहे.

गूगलने आपल्या डूडलमधून भारताचा ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीपासून ते स्मार्टफोनपर्यंतचा प्रवास दाखवला आहे. त्यातूनच प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर पार पडणारी परेड गेल्या काही दशकांमध्ये पडद्यावर कशी दिसली हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. डूडल्स हा एक प्रकारच्या रेखाचित्राचा भाग आहे; ज्यामध्ये अगदी सर्वांत मोठ्या घटना किंवा विषयांचे चित्रण अगदी सोप्या पद्धतीने केले जाते.
गेल्या काही वर्षांमध्ये आपण कॅथोड रे ट्युबसह मोठ्या टेलिव्हिजन सेटपासून लहान टीव्ही आणि नंतर स्मार्टफोन्सकडे वळलो आहोत.

या डूडलमध्ये दोन टीव्ही संच आणि एक मोबाइल फोन दाखवण्यात आला आहे. त्यामध्ये Google मधील ‘G’ हे अक्षर पहिल्या ॲनालॉग टेलिव्हिजन सेटवर डावीकडे लिहिले आहे; तर दोन ‘O’ अक्षरे म्हणजे दोन टीव्ही स्क्रीन म्हणून दाखविल्या आहेत आणि ‘G’, ‘L’ व ‘E’ ही उरलेली तीन इंग्रजी अक्षरे उजवीकडे दाखवलेल्या मोबाईल हॅण्डसेटच्या स्क्रीनवर लिहिलेली आहेत. पहिल्या टीव्ही स्क्रीनवर परेडमधील एक दृश्य ब्लॅक अँड व्हाईट रंगात दाखविण्यात आले आहे; तर दुसऱ्या रंगीत स्क्रीनवर उंटाची स्वारी दाखवून तंत्रज्ञानाचा प्रवास ठळकपणे दाखविण्यात आला आहे.

या डूडलवर लिहिले आहे की, “हे डूडल भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त तयार करण्यात आले आहे, १९५० मध्ये भारतानाने संविधान स्वीकारले आणि राष्ट्राने स्वतःला सार्वभौम, लोकशाही आणि प्रजासत्ताक घोषित केले, हे डूडल त्यादिवसाची आठवण करुन देते.
त्यात म्हटले आहे, “आजचे डूडल पाहुणे कलाकार वृंदा झवेरी यांनी तयार केले आहे, जे विविध प्रकारच्या स्क्रीनवर गेल्या दशकांतील प्रजासत्ताक दिनाच्या परेडचे चित्रण करते.”

Tags: