सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीचे वातावरण हळूहळू तापत आहे. लोकसभेचे महायुद्ध जिंकून देशाचे सुकाणू हाती घेण्यासाठी प्रबळ राजकीय पक्षांमध्ये लढाई सुरू आहे. दरम्यान, भाजपचा बालेकिल्ला असलेल्या बेळगाव लोकसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी दोन राष्ट्रीय पक्षांमध्ये इच्छुकांची स्पर्धा सुरू आहे. त्याबाबतचा हा रिपोर्ट.
तडजोडीच्या राजकारणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेळगाव जिल्ह्यात राजकीय बुद्धिबळाचा सामना कसा रंगेल हे सांगता येत नाही. जिल्ह्यात पक्षकेंद्रित राजकारणापेक्षा व्यक्तीकेंद्रित राजकारण महत्त्वाचे आहे. निवडणूक नुसती निवडणूक न राहता ती बलाढ्य घराण्यांमधील प्रतिष्ठेच्या लढाईतही बदलते. या सर्व कारणांमुळे बेळगाव लोकसभा मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष लागून असते.
GFX:
बेळगाव लोकसभा मतदारसंघ चार दशके होता काँग्रेसचा बालेकिल्ला
धर्मनिरपेक्ष जनता दल हा गड एकदा जिंकला होता
2004 पासून सलग विजयी झालेले सुरेश अंगडी एकमेव खासदार
बेळगाव लोकसभा मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर भारताच्या स्वातंत्र्यानंतर बेळगाव लोकसभा मतदारसंघ हा सुमारे चार दशके काँग्रेसचा बालेकिल्ला होता. 1952 ते 1991 पर्यंत या जिल्ह्यावर काँग्रेसचे उमेदवार सतत विजयी होत होते. बेळगाव लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे एस. बी. सिदनाळ यांनी ४ वेळा विजय मिळवून सर्वाधिक वेळा खासदार म्हणून इतिहास रचला आहे.
1991 नंतर भाजपने एक टर्म, जनता दल आणि काँग्रेसने एकदा विजय मिळवला. 2004 मध्ये भाजप पक्षाकडून निवडणूक लढवणारे माजी केंद्रीय मंत्री दिवंगत सुरेश अंगडी सलग विजयी झाले होते. 2021 मध्ये अकाली त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर त्यांच्या पत्नी मंगल अंगडी यांच्या रूपाने भाजपने ही जिंकली आणि आता बेळगाव मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला बनला आहे.
दरम्यान, बेळगाव लोकसभेच्या तिकिटासाठी दोन्ही राष्ट्रीय पक्षांमध्ये चुरशीची स्पर्धा आहे. काँग्रेसमध्ये इच्छुकांची यादी थोडी कमी आहे, पण भाजपमध्ये तिकीट इच्छुकांची यादी मारुतीच्या शेपटीसारखी वाढत आहे.
GFX:
रेल्वे राज्यमंत्री असलेले सुरेश अंगडी यांचे 2020 मध्ये निधन
लोकसभा पोटनिवडणुकीत मंगल अंगडी यांचा विजय
आ. भालचंद्र जारकीहोळी बेळगाव मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता
बदललेल्या राजकीय समीकरणात दिवंगत सुरेश अंगडी हे मोदी सरकारमध्ये रेल्वे राज्यमंत्री होते. त्यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला आणि चौथ्यांदा खासदार म्हणून निवडून आले. पण 2020 मध्ये कोविडमुळे त्यांचे अकाली निधन झाल्याने त्यांची पत्नी मंगल अंगडी यांनी पोटनिवडणूक लढवली होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सुरेश अंगडी 3 लाख 91 हजार मतांनी विजयी झाले होते. त्यांना या निवडणुकीत 63.22 टक्के मते मिळाली. मात्र त्यांच्या पत्नीने लढवलेल्या पोटनिवडणुकीत केवळ 5240 मतांनी विजय मिळवला. याचे प्रमुख कारण म्हणजे काँग्रेसकडून सतीश जारकीहोळी हे प्रबळ उमेदवार रिंगणात होते. मंगल अंगडी यांच्या चेहऱ्यावर अगदी शेवटच्या क्षणी विजयाचे हसू आले हा आता इतिहास आहे.
काँग्रेस आणि भाजपच्या तिकीट इच्छुकांची यादी पाहिली तर काँग्रेसमध्ये ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी, मंत्री लक्ष्मी हेब्बाळकरपुत्र मृणाल हेब्बाळकर, किरण साधुन्नावर, सतीश जारकीहोळी यांच्या कन्या प्रियांका जारकीहोळी हे काँग्रेसचे प्रबळ तिकीट इच्छुक आहेत.
भाजपकडून माजी एमएलसी महांतेश कवटगीमठ, माजी आमदार संजय पाटील व अनिल बेनके, येडियुरप्पा यांचे निकटवर्तीय मानले जाणारे शंकरगौडा पाटील, डॉ. सोनाली सरनोबत इच्छुक आहेत. पण, आश्चर्य म्हणजे बेळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार म्हणून अरभावीचे आमदार भालचंद्र जारकीहोळी हे रिंगणात उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही. भालचंद्र जारकीहोळी यांनी राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जाते.
या सगळ्या पार्श्वभूमीवर साधारणपणे येत्या काही दिवसांटच बेळगाव लोकसभा मतदारसंघातील उमेदवार कोण असेल हे समजून येईल, त्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल इतकेच.


Recent Comments