माध्यान्ह आहार प्रकल्पातील स्वयंपाकघर सहाय्यकांना किमान वेतन द्यावे, आशा-अंगणवाडी कार्यकर्त्या, नरेगा कामगार आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सिटूच्या नेतृत्वाखाली स्कीम कर्मचाऱ्यांनी बेळगावात आज खासदार कार्यालयासमोर आंदोलन केले.
बेळगावच्या खासदार मंगल अंगडी यांच्या कार्यालयासमोर सिटूच्या नेतृत्वाखाली स्कीम कर्मचाऱ्यांनी बेळगावात आज खासदार कार्यालयासमोर आंदोलन केले. केंद्र आणि राज्य सरकारच्या कष्टकरी जनताविरोधी धोरणांमुळे कष्टकरी कामगारांचे जीवन हलाखीचे झाले आहे. गेल्या 9 वर्षांपासून भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कामगार विरोधी धोरणांमुळे करोडो लोकांच्या दैनंदिन जीवनावर विपरित परिणाम झाला आहे. याचा निषेध करत राणी चेन्नम्मा सर्कल पासून खासदार कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला.
या आंदोलनाबाबत बोलताना अक्षर दासोह कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष एल. एस. नाईक म्हणाले की, असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या विविध मागण्या पूर्ण करण्याचा आग्रह धरून आज देशभरात तीन दिवसीय आंदोलन करण्यात येत आहे. अक्षर दासोह महिला कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, विविध कामगार संघटनांचा यात सहभाग आहे. पहिल्या दिवशी योजना कर्मचाऱ्यांचे आंदोलन, दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांचे आंदोलन, तिसऱ्या दिवशी बांधकाम कामगारांचे आंदोलन असेल. कामगारांच्या हक्कासाठी तीन दिवस आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बेळगाव जिल्हा अंगणवाडी कार्यकर्त्या संघटनेच्या पदाधिकारी गंगाम्मा पुजारी यांनी, हा लढा राज्यभरात देणार असल्याचे सांगितले. काँग्रेस सरकारच्या जाहीरनाम्यात अंगणवाडी सेविकांना 6 हजार तर कार्यकर्त्यांना 15 हजार देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अद्याप वेतन जाहीर केले नसल्याबद्दल संताप व्यक्त केला.
या आंदोलनात सीटू संघटनेच्या सदस्या, माध्यान्ह आहार कर्मचारी, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस सहभागी झाल्या होत्या.


Recent Comments