Belagavi

बेळगावच्या चव्हाट गल्लीत जल्लोषात राम उत्सव

Share

अयोध्येतील श्रीराम मंदिरात प्रभू रामचंद्रांच्या बाल स्वरूपातील मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्याच्या पार्श्वभूमीवर बेळगावातील चव्हाट गल्ली येथे सोमवारी भव्य रामोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. भाजपचे राज्य उपाध्यक्ष व माजी आमदार अनिल बेनके यांनी दीपप्रज्वलन करून रामाचा जयघोष करत या उत्सवाचा प्रारंभ केला.

राममंदिराच्या उद्घाटनाच्या जल्लोषाच्या पार्श्वभूमीवर बेळगावात सर्वत्र भगवे झेंडे फडकत होते. विविध मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. याशिवाय गल्लो-गल्लीत अयोध्येचे थेट प्रक्षेपण पाहणाऱ्या लोकांनी जल्लोष व्यक्त केला. त्यामुळे कुंदानगरी बेळगाव पूर्णपणे राममय झाली. बेळगावच्या मध्यवर्ती ठिकाणच्या चव्हाट गल्ली येथे भाजपचे राज्य उपाध्यक्ष अनिल बेनके यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजपचे उपाध्यक्ष अनिल बेनके म्हणाले की, भारतातील कोट्यवधी नागरिकांनी जवळपास 500 वर्षांपासून पाहिलेले राम मंदिराचे स्वप्न आज साकार झाले आहे. रामजन्मभूमी अयोध्येत बांधण्यात आलेल्या भव्य राममंदिराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होत असल्याचा आनंद होत आहे.

ते पुढे म्हणाले की, अयोध्या राममंदिर आणि बेळगाव यांचे अतूट नाते आहे. रामजन्मभूमी मंदिरासाठी बेळगावातील 500 हून अधिक लोकांनी करसेवा केली आहे. त्यामुळे आज रामलल्लाच्या पुतळ्याच्या स्थापनेनिमित्त संपूर्ण शहरात उत्सवाचे वातावरण होते. सरबत, ताक यांच्यासह मिठाईचे वाटप करण्यात येत असून, अनेक ठिकाणी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी चव्हाट गल्ली व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: