हुक्केरी तालुक्यातील यमकनमरडी मतदारसंघात प्रवाशांना आवश्यक बससेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. फेब्रुवारी महिन्यापासून आणखी नवीन बसची व्यवस्था करण्यात येणार आहे, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्हा पालक सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.

हुक्केरी शहरातील तालुका पंचायत सभागृहात आयोजित जन तक्रार निवारण सभेत बोलताना ते म्हणाले की, प्रवाशी तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आवश्यक बस वाहतूक उपलब्ध करून दिली जाईल.
कोचरी, राजकट्टी, दड्डी, मारनहोळ, उल्लागड्डी खानापूर, यमकनमरडी व इतर मार्गावर बस वाहतुकीचा अभाव असून तो दूर करण्यात येईल. जल जीवन अभियानांतर्गत तालुक्यातील प्रत्येक घरापर्यंत पाणीपुरवठा करण्याचा प्रकल्प अधिकारी मिश्रकोटी यांच्यामुळे व्यवहार्य नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे, असे सांगत त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
सभेनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री जारकीहोळी म्हणाले की, फेब्रुवारी महिन्यात प्रत्येक आगारात 10 नवीन बसेस येणार आहेत, ज्यामुळे बससेवेचा आणखी विस्तार होईल. जलजीवन अभियानांतर्गत (जेजेएम) सुरू असलेल्या कामांमध्ये बहुतांश ठिकाणी तांत्रिक दोष आणि अशास्त्रीय काम असल्याच्या गंभीर तक्रारी कानावर आल्या आहेत. यासंदर्भात ग्रामीण पेयजल व स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदारांना विहित मुदतीत दर्जेदार काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

यावेळी भाऊसाहेब पांढरे यांच्या नेतृत्वाखाली मडीहळ्ळी गावातील अनुसूचित उमेदवारांना रोजगारासाठी शासकीय रिक्त जागा उपलब्ध करून देण्याचे निवेदन मंत्र्यांना देण्यात आले तसेच कर्नाटक राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अविनाश होलेप्पगोळ यांच्या नेतृत्वाखाली विविध विभागांचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले. सातवे वेतन, जुनी पेन्शन, आरोग्य संजीवनी योजना लागू करण्याची विनंती त्यांनी केली.
यावेळी समाजकल्याण विभागाचे सहसंचालक तथा तालुका पंचायत प्रशासक लक्ष्मण बबली, तहसीलदार मंजुळा नायक, तालुका पंचायत ईओ प्रवीण कट्टी, व्यवस्थापक अविनाश होलेप्पगोळ, कुलकर्णी, काँग्रेस जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी, नेते रवींद्र जिंद्राळी, इलियास इनामदार, किरण राजपूत, किरण पाटील, वृषभ पाटील, बसवराज कोळी, आनंद तवगमठ, अक्षय वीरमुख आदी उपस्थित होते.


Recent Comments