Belagavi

हुतात्मा दिवस गांभीर्याने पाळण्याचे युवा समितीचे आवाहन

Share

येत्या 17 जानेवारी रोजी हुतात्मा दिवस गांभीर्याने पाळावा व मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची व्यापक बैठक शनिवारी अध्यक्ष अंकुश केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या वतीने सीमाभागातील मराठी नागरिकांसाठी मुख्यमंत्री आरोग्य योजना व जोतिराव फुले जनआरोग्य योजना राबविण्यात येणार होती. पण कन्नड संघटनाच्या दबावखाली येत प्रशासनाने येत याला विरोध केला असून मराठी भाषिकांची सेवाकेंद्रे कोणतीही पडताळणी न करता बंद पाडली आहेत हे निषेधार्थ आहे. वैद्यकीय सुविधा रोखणे म्हणजे मानवाधिकारांचे उल्लंघन आहे, मानवतेच्या दृष्टिकोनातून राबविणाऱ्या योजनांचा विरोध केला जाऊ नये अशी मागणी या बैठकीत करण्यात आली.

तसेच महानगर पालिकेच्या वतीने कन्नड नामफलक सक्ती राबविण्यासाठी व्यापारी परवाने रद्द करण्यासाठी कायदेशीर नोटीस दिली जात आहे. त्यामुळे नागरिक व व्यापाऱ्यांच्या मूलभूत अधिकारांचे हनन होत असून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने ही सक्ती थांबवावी यासाठी निवेदन देण्यात आले आहे. तरीही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. तरी ही मोहीम त्वरित थांबवावी अशी मागणी बैठकीत करण्यात आली.

बैठकीला कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, उपाध्यक्ष राजू कदम, सिद्धार्थ चौगुले, वासू सामजी, सरचिटणीस श्रीकांत कदम, सूरज कुडूचकर, संतोष कृष्णाचे, प्रतिक चंद्रकांत पाटील, नितिन गुंडप, महेश चौगुले, आशिष कोचेरी, महेश जाधव, रणजित हावळणाचे, मनोज पाटील, सौरभ जोशी, भालचंद्र पाटील, रितेश पावले, अश्वजीत चौधरी आदी उपस्थित होते.

Tags: