घाटमाथ्यावर कोकणी भाषा समृद्ध करण्यात ‘उजवाड’ मासिकाने दिलेले योगदान अमूल्य आहे असे गौरवोद्गार गोव्याचे क्रीडा आणि युवा, ग्राम विकास, कला आणि सांस्कृतिक कार्य मंत्री गोविंद गावडे यांनी काढले.
बेळगावच्या सेंट झेवियर्स हायस्कूल हॉलमध्ये सोमवारी सकाळी कोकणी लोकोत्सव आणि उजवाड रौप्यमहोत्सवाचे उदघाटन केल्यावर ते बोलत होते. यावेळी यांच्याहस्ते ‘उजवाड’च्या रौप्यमहोत्सवी अंकाचे प्रकाशन, उजवाड गौरव पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. कोंकणी हास्यकवी संमेलन आणि गोव्याहून खास आलेल्या कलाकारांचा ‘लोकनाद’ हा बहारदार कोंकणी सांस्कृतिक कार्यक्रम अशा तऱ्हेच्या कोंकणी लोकोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने समारंभाचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी बोलताना मंत्री गोविंद गावडे पुढे म्हणाले की, कोकणी ही अत्यंत रसाळ, संस्कृतीपूर्ण आणि संस्कारी भाषा आहे. या भाषेचा स्वतःचा असा एक विशिष्ट गोडवा आहे. या भाषेच्या विकास आणि संवर्धनासाठी पत्रकार लुईस रॉड्रीग्ज यांनी २५ वर्षांपूर्वी सुरु केलेल्या उजवाड मासिकाच्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. घाटमाथ्यावर कोकणीची पताका फडकावत ठेवण्याचे महत्वाचे कार्य लुईस रॉड्रीग्ज यांनी उजवाडच्या माध्यमातून केले आहे. त्यांचे हे कार्य खूप मोठे आहे असे प्रशंसोद्गार त्यांनी काढले. आज इंग्लिश जरी जागतिक भाषा बनली असली तरी आपण, आपली संस्कृती, परंपरा टिकण्यासाठी प्रादेशिक भाषा टिकल्या पाहिजेत. त्यासाठी कोकणीसारख्या प्रादेशिक भाषा टिकण्यासाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक आहेत, असे त्यांनी सांगितले.

बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ उर्फ राजू सेठ म्हणाले की, कोकणी ही अतिशय गोड आणि रसाळ भाषा आहे. सेंट पॉल्समध्ये शिकताना माझ्या अनेक कोकणी भाषिक मित्रांच्या सहवासात राहून मला या भाषेविषयी जिव्हाळा निर्माण झाला. या कोकणी भाषेच्या संवर्धनासाठी लुईस रॉड्रीग्ज उजवाड मासिकाच्या माध्यमातून भरीव कार्य करत आहेत. त्यांच्या या कार्याला मी शुभेच्छा देतो असे त्यांनी सांगितले.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी बेळगाव आणि कारवारचे बिशप डॉ. डेरीक फर्नांडीस होते. उजवाड या दक्षिण महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकातील पहिल्या कोंकणी मासिकाची सुरुवात बेळगाव येथून झाली. अतिशय लहान प्रमाणात सुरुवात होवून संपादक लुईस रॉड्रीग्स आणि सहकाऱ्यांच्या खडतर परिश्रमामुळे उजवाड मासिकाचा वाचक वर्ग बाढत गेला, कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोव्यातील विविध गावांमध्ये जेथे कोंकणी भाषिक असतील तेथे प्रत्यक्ष जावून त्यांनी मासिकाचा प्रचार केला, गेल्या 25 वर्षात उजवाड व्यासपीठाखाली संपादक लुईस रॉड्रीग्स व सहका-यांनी विविध कार्यक्रम घडवून आणले, घाटमाथा आणि कर्नाटकात दूरवर विखुरलेले कोंकणी भाषिक यामुळे एकत्र आले. या कार्याबद्दल लुईस रॉड्रीग्स यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला.
त्याचप्रमाणे मोनिका पीटर डांटस, मिलाग्रीन आंद्रु डिसोझा, डॉ. मनीषा झेवियर रेगो, ॲड. पल्लवी बस्तु रेगे, रिटा सुरिंदर भगत, अनामेरी मनवेल बार्देस्कर, नील मॅथ्यू मंतेरो, साविओ आगापीत परेरा, गाब्रियेल मिनीन डिसोझा, अंतोन डिसोझा, अगोस्तीन शाहू बार्देस्कर, अशोक विश्वनाथ पै, गौरीश रमाकांत वेर्णेकर, फादर प्रदीप कारेया यांचा उजवाड कोंकणी गौरव पुरस्कार-2024 देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी बाळकृष्ण पै, गिरगोल रॉड्रीग्ज, सायमन लोबो, मॅन्युएल रॉड्रीग्ज, मिनीन गोन्साल्विस, एलिझाबेथ रॉड्रीग्ज यांच्यासह उजवाड मासिकाच्या या रौप्यमहोत्सवी सोहळ्यास कोंकणी भाषिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments