Belagavi

दहा हजार जणांना श्रीरामाचे टॅटू काढण्याचा आ. अभय पाटील यांचा उपक्रम

Share

अयोध्येत श्रीराम मंदिरात ‘रामलल्ला’च्या मूर्ती प्रतिष्ठापना आणि राममंदिर उदघाटनाची पार्श्वभूमीवर बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी तब्बल दहा हजार व्यक्तींना श्रीरामाचे टॅटू काढण्याचा संकल्प सोडला आहे. त्यांच्या या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद लाभत असून, आज पहिल्याच दिवशी तब्बल तीन हजार जणांनी नोंदणी केली.

होय, येत्या २२ जानेवारीला अयोध्येत श्रीराम मंदिरात ‘रामलल्ला’च्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. त्यानिमित्त देशभरात जपतप, होमहवन असे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचप्रकारे बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी दक्षिण मतदारसंघातील तब्बल दहा हजार व्यक्तींच्या हातावर श्रीरामाचे कायमस्वरूपी टॅटू काढण्याचा संकल्प सोडला आहे. त्यांच्या या उपक्रमास प्रचंड प्रतिसाद लाभला आहे. आज पहिल्याच दिवशी तब्बल तीन हजार जणांनीं यासाठी नोंदणी केली. ओल्ड पीबी रोडवरील आ. पाटील यांच्या कार्यालयात टॅटू काढण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. स्वतः आ. अभय पाटील यांनी उपस्थित राहून रामभक्तांच्या भक्तीचा अनुभव घेतला.

या अनोख्या मोहिमेसंदर्भात प्रसारमाध्यमांना माहिती देताना बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी सांगितले की, अयोध्येतील श्रीराम मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त देशभरात विविध कार्यक्रम होत आहेत. या शुभप्रसंगी दक्षिण मतदारसंघातील दहा हजार व्यक्तींच्या हातावर श्रीरामाचे कायमस्वरूपी टॅटू काढण्याचा संकल्प आम्ही सोडला आहे.

रामाचा टॅटू काढण्यासाठी 3000 तरुणांनी नाव नोंदणी केली आहे, 30-40 कार्यकर्ते टॅटू काढणार आहेत, आम्ही शिवाजी गार्डन, आरपीडी क्रॉस, हरी मंदिराजवळ टॅटू सेंटर सुरू करत आहोत, बाहेरच्या राज्यातून अनेक तरुण सहभागी होत आहेत. या मोहिमेत त्यांचेही स्वागत आहे. महिला-मुलींना महिला कलाकारच टॅटू काढणार आहेत. बीपी, शुगर असणारे आणि गर्भवती महिलांना टॅटू काढले जाणार नाहीत. प्रत्येकाला टॅटूसाठी स्वतंत्र सुया वापरण्यात येतील. आरोग्याचे सर्व नियम पाळूनच हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

बेळगाव दक्षिण मतदारसंघात 80 हजार लाडू तयार केले जात असून ते मतदारसंघातील 80 हजार कुटुंबांपर्यंत पोहोचणार आहेत. हे लाडू राजस्थानमधील व्यावसायिक कामगारांनी तयार केले आहेत. २२ जानेवारीला बेळगावात अयोध्येचा जल्लोष पाहायला मिळणार आहे, असे ते म्हणाले.

एकंदर, नेहमी नवनवीन उपक्रम राबविण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या आ. अभय पाटील यांनी श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त टॅटू काढण्याचा आणि लाडू वितरणाचा आणखी एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून श्रीरामावरील भक्ती दाखवून दिली आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Tags: